- PRESS CONFERENCE, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

संपूर्ण नागपूर माझे कुटुंब!

नागपूर समाचार : मी टनेल्स तयार केले, उड्डाणपूल केले, सात जागतिक विक्रम केले. पण हे सारे काम नागपूरच्या जनतेने निवडून दिल्यामुळेच मी करू शकलो. मी नागपूर लोकसभेची निवडणूक जिंकलो नसतो तर मंत्री झालो नसतो आणि मंत्री झालो नसतो तर काम करू शकलो नसतो. त्यामुळे माझ्या कामाचे सगळे श्रेय नागपूरच्या जनतेचे आहे. त्यामुळे जगात कुठेही गेलो तरीही नागपूरला कधीही विसरत नाही आणि विसरणार नाही. नागपूर माझ्या मनात आहे. नागपूरचे लोक माझे माझे कुटुंब आहे आणि या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे केले.

नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार ना. श्री. नितीन गडकरी यांच्या आनंदम् (गणेशपेठ) येथील मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज (शनिवार) झाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते श्री. दत्ता मेघे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार टेकचंद सावरकर, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी मंत्री तसेच बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या नेत्या श्रीमती सुलेखा कुंभारे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी आमदार सुधाकर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. प्रशांत पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मोबाईलचा टॉर्च लावून उपस्थितांनी ना. श्री. नितीन गडकरी यांना समर्थन दर्शवले. मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या नागरिकांचे त्यांनी सुरुवातीला आभार मानले. ‘तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, याचा खूप आनंद झाला. तुमचे प्रेम, विश्वास बघून पाच लाखांपेक्षा जास्त मतांनी मी निवडून येईल असा विश्वास आहे,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ‘दहा वर्षांत मी १ लाख कोटींची कामे नागपूर लोकसभा क्षेत्रात केली. पण हा ट्रेलर आहे, असली पिक्चर अभी बाकी है. नागपूर हे टायगर कॅपिटल आहे. नागपूर झिरो माईल आहे. आरेंज कॅपिटल आहे. नागपूर झिरो माईलमुळे लॉजिस्टिक कॅपिटलही होणार आहे. नागपूरला देशातील नव्हे तर जगातील उत्तम शहरांमध्ये स्थान मिळवून द्यायचे आहे,’ असा निर्धार ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ‘विकासात राजकारण करण्याचे संस्कार आमच्यावर झाले नाहीत. दलित, शोषित, पीडितांना परमेश्वर मानून सेवा करण्याचे संस्कार झाले आहेत. माझ्या तत्त्वांशी प्रामाणिक राहिलो म्हणूनच देशात ५० लाख कोटींची कामे करू शकलो. भ्रष्टाचाराला स्थान दिले नाही,’ याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 

प्रचारगीताचे लॉन्चिंग

सुप्रसिद्ध गायक-संगीतकार श्री. शंकर महादेवन आणि त्यांचे सुपुत्र श्री. सिद्धार्थ महादेवन यांनी ना. श्री. नितीन गडकरी यांच्यासाठी तयार केलेल्या ‘विजयीभव:’ या निवडणूक प्रचारगीताचे लॉन्चिंग करण्यात आले.  

चोवीस तास पाण्याचे स्वप्न

आम्ही नागपूरला चोवीस तास पाणी देण्याचे स्वप्न बघितले होते. आज ७५ टक्के नागपूरला चोवीस तास पाणी मिळत आहे. ८९ नवीन जलकुंभ उभारण्यात येत आहेत. येत्या सहा महिन्यांमध्ये संपूर्ण नागपूरला चोवीस तास पाणी.

जातीयवादाला उखडून फेकायचे आहे

कोरोनाच्या कठीण काळात आक्सीजनच्या अभावामुळे लोकांना प्राण गमवावे लागत होते. त्यावेळी आम्ही शंभर कोटींचे साहित्य, आक्सीजन प्लान्ट, व्हेंटिलेटर्स, आक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्स निःशुल्क वाटले. नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भात. जात-पात-धर्म बघितले नाही. त्या आधारावर कुणालाही कमी नेमले नाही. जातीयवादाला उखडून फेकायचे आहे, असा निर्धार ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. 

संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही

सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हा पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा नारा आहे. त्या आधारावर देश पुढे जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची रक्षा करण्याचे काम करणार आहे. संविधान बदलण्याचा आरोप आमच्यावर होतो. हा अपप्रचार करणाऱ्यांनी अनेकदा संविधानाचा अपमान केला आहे, असा आरोपही ना. श्री. गडकरी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *