- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : विकासात भेदभाव नाही! – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

नागपूर समाचार : गरिबांना घरे, तरुणांना रोजगार, रुग्णांना आरोग्याच्या उत्तम सुविधा देणे हेच आपले धोरण राहिले आहे. चांगले मार्केट, पार्किंगची उत्तम सुविधा, उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना आपण राबवित आहोत. शहरातील प्रत्येक घटकाचे कल्याण करण्यासाठी कामे केलीत आणि भविष्यातही करणार आहे. कधीही जात-पात धर्माचा विचार केला नाही आणि करणार नाही. विकासात कधीही भेदभाव होणार नाही हा माझा शब्द आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे केले.

एम्प्रेस मॉल येथील नक्षत्र सेलिब्रेशनमध्ये मध्य नागपूर भाजपा बुथ शक्ती केंद्र आणि पदाधिकाऱ्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, मध्य नागपूरचे अध्यक्ष श्री. श्रीकांत आगलावे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर अर्चना डेहनकर, श्री. गिरीश देशमुख, श्री. सुधीर राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना ना. श्री. नितीन गडकरी यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. मोठ्या मतांची आघाडी मिळवून देण्याचा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी ना. श्री. नितीन गडकरी यांना दिला.

‘मी मध्य नागपूरचाच रहिवासी आहे. मी माझ्या राजकीय आयुष्याला सुरुवात केली तेव्हा परीश्रमी कार्यकर्ते होते. आजही आहेत. त्यामुळे माझा कार्यकर्त्यांवर विश्वास आहे आणि त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांनी शक्ती पणाला लावली तर मोठी आघाडी मिळेल,’ असा विश्वास ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

‘निवडणुकीत उमेदवाराचा परिचय दिला जातो. तो आवश्यकही आहे. पण मी दहा वर्षांमध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात १ लाख कोटींची कामे केली आहेत. अनेक कामे झाली आहेत आणि काही सुरू आहेत. नागपूर हे जगातील सर्वांत सुंदर शहरांमध्ये असावे, देशातील पहिल्या तीन देशांमध्ये असावे, अशी इच्छा आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा चांगल्या असणे गरजेचे आहे. आणि त्याच दिशेने माझे काम सुरू आहे,’ असेही ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले.

मध्य नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झालीत, बरीच कामे सुरू आहेत आणि भविष्यात बरीच कामे होणार आहेत, याचाही त्यांनी उल्लेख केला. देशात सर्वाधिक काँक्रिटचे रस्ते नागपुरात आहेत. चोवीस तास पाणी देणारी नागपूर महानगरपालिका देशातील एकमेव आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मध्य नागपूरचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *