- Breaking News, नागपुर समाचार, बाजार

नागपूर समाचार : विकासाचे विकेंदीकरण हा ‘अॅडव्‍हांटेज विदर्भ’चा होता उद्देश – केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी  

‘खासदार औद्योग‍िक महोत्‍सव – अॅडव्‍हांटेज विदर्भ’चा थाटात समारोप

नागपूर समाचार :  विकासाचे विकेंद्रीकरण करणे हा ‘अॅडव्‍हांटेज विदर्भ’ चा मुख्‍य उद्देश होता. त्‍या काही प्रमाणात सफल झाला असून पुढील वर्षी प्रत्‍येक जिल्‍ह्याचे स्‍वतंत्र दालन उभारून तेथील उद्योगांना स्‍थान देण्‍यात येईल. त्‍यामुळे प्रत्‍येक जिल्‍ह्यात विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केला. 

असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट (एड) च्‍यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून आयोजित तीन दिवसीय खासदार औद्यो‍गिक महोत्‍सव – अॅडव्‍हांटेज विदर्भ या विदर्भातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचा आज सोमवारी थाटात समारोप झाला. 

राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या प्रशासकीय इमारतीच्‍या भव्‍य परिसरात झालेल्‍या या कार्यक्रमाला राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री ग‍िरीश महाजन, खा. रामदास तडस, खा. कृपाल तमाने, आ. मोहन मते, अॅड. सुलेखा कुंभारे, मेट्रो सीएमडी श्रावण हर्डीकर, अर्थतज्‍ज्ञ आनंद राठी, गोयल गंगा ग्रुपचे अतुल गोयल, उद्योगपती सुरेश शर्मा यांच्‍यासह एडचे पदाधिकारी मंचावर उपस्‍थ‍ित होते. 

विदर्भात गुंतवणूकदार यावे, मोठ्या प्रमाणात, गुंतवणूक व्‍हावी, येथील उद्योगाचा विकास व्‍हावा, त्‍यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्‍हावा, या उद्देशाने या महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर उद्योजक, मंत्री, विविध संस्‍थाचे अध्‍यक्ष व गंतवणूकदार यांनी या महोत्‍सवाला भरभरून प्रतिसाद दिल्‍याबद्दल नितीन गडकरी यांनी सर्वाचे आभार मानले. 

अॅडव्‍हांटेज विदर्भमुळे विदर्भाची ताकद तर कमजोरी लक्षात आली. कमजोरीवर काम करून त्‍याचे ताकदीमध्‍ये परिवर्तन करण्‍याचे प्रयत्‍न केले जातील, असा विश्‍वास व्‍यक्‍त करत पुढील आणखी मोठ्या प्रमाणात महोत्‍सव आयोज‍ित केला जाईल, असे नितीन गडकरी म्‍हणाले. 

अॅडव्‍हांटेज विदर्भच्‍या यशस्‍वीतेसाठी असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे; उपाध्यक्ष प्रणव शर्मा आणि गिरधारी मंत्री; सचिव डॉ.विजय शर्मा; कोषाध्यक्ष राजेश बागडी व सदस्य राजेश रोकडे, निखिल गडकरी, डॉ.महेंद्र क्षीरसागर, प्रदीप माहेश्वरी, प्रशांत उगेमुगे, रवींद्र बोरटकर यांचे सहकार्य लाभले. 

आशीष काळे यांनी तीन दिवसीय या महोत्‍सवाबद्दल माहिती देताना यात यशस्‍वी स्‍टार्टअप, 250 हून अधिक स्‍टॉल, सर्व आकाराच्‍या इंडस्‍टीचा सहभाग राहिला. विदर्भात इंडस्‍ट्रीसाठी इकोसिस्‍टीम असल्‍याचे या महोत्‍सवातून लक्षात आले. अनेक सामंजस्‍य करार झाले. नितीन गडकरींचे व्हिजन आणि आमच्‍या प्रयत्‍नांचे हे यश आहे, असे ते म्‍हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. राजेश रोकडे यांनी आभार मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *