- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

नागपूर/रामटेक समाचार : मोहे राम म‍िलन की…. कैलाश खेर यांच्‍या रामभक्‍तीने रामटेकवासी भारावले

‘महासंस्कृती महोत्सवा’चा ‘हाऊसफुल्‍ल’ गर्दीत समारोप 

नागपूर/रामटेक समाचार : संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्‍या अयोध्‍येतील प्रभू श्रीराम यांच्‍या प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यात सहभागी होऊन थेट रामटेकनगरीत आलेल्‍या विश्‍वविख्‍यात गायक कैलाश खेर यांच्‍या रामभक्‍तीने रामटेकवासी भारावून गेले. रामटेककरांच्‍या हृदयात रामाचा वास असून आज ही गर्दी पाहून मला त्‍यांचा आशीर्वाद मिळाला असल्‍याचा भास होतो आहे, असे म्‍हणत ‘मोहे राम म‍िलन की आंस’ हे गीत सादर केले. 

महाराष्‍ट्र शासनाच्‍या सांस्‍कृतिक कार्य संचालनालयाचा सांस्‍कृतिक विभाग व जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने मागील पाच दिवसांपासून रामटेक येथील नेहरू मैदानात सुरू असलेल्‍या ‘महासंस्‍कृती महोत्‍सवाचा आज प्रचंड गर्दीत समारोप झाला. या समारोपीय कार्यक्रमात विख्यात गायक पद्मश्री कैलाश खेर आणि कैलासा बँड यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्टने रामटेककर मंत्रमुग्‍ध झाले. यावेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओच्‍या माध्‍यमातून शुभेच्‍छा संदेश दिला. सकाळच्‍या सत्रात बोटींग स्‍पर्धा पार पडली. 

अयोध्‍येतील प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर मागील सात दिवसांपासून सकाळी 11 वाजून 11 म‍िनिटांनी आम्‍ही एक गीत विमोचित करीत होतो. त्‍यातले शेवटचे गीत काल अयोध्‍येत विमोचीत केल्‍याचे सांगत कैलाश खेर यांनी त्‍यातील एक एक गीत सादर करीत आपली गायन सेवा रामचरणी अर्पण केली. 

‘मै तो तेरे प्‍यार में दिवाना हो गया’, ‘तौबा तौबा वे तेरी सुरत’, ‘वो जाने ना’, ‘पिया के रंग, रंग दि नी ओढणी’ आदी गाणी सादर करून कैलाश खेर यांनी रामटेकवासीयांना थिरकायला भाग पाडले. रात्री बराच वेळ चाललेल्‍या या कार्यक्रमाचा नागरिकांनी मनमुराद आनंद घेतला.   

रामटेकच्‍या उपविभागीय महसूल अधिकारी वंदना विराणी म्‍हणाल्‍या, पाच दिवसांचा हा महासंस्‍कृती महोत्‍सव रामटेककरांसाठी सांस्‍कृतिक मेजवानी देणारा ठरला. या यशस्‍वी आयोजनात सहभागी अॅड. आ. आशीष जयस्‍वाल, प्रशासनाचे पदाधिकारी, कलाकार, स्‍वयंसेवी संस्‍था, रामटेकवासीयांचे त्‍यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्‍यामल देशमुख यांनी केले.

हा तर दुग्‍धशर्करा योग – मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे 

महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य असून अनेक कलांचा संगम असलेल्‍या या राज्‍यातील कला लुप्‍त होऊ नये, त्‍यांचे जतन व्‍हावे आणि कलाकारांना प्रोत्‍साहन म‍िळावे, या उद्देशाने ‘महासंस्‍कृती महोत्‍सव’ आयोजित करण्‍यात येत आहे. विदर्भातील 11 ज‍िल्‍ह्यांमध्‍ये होत असलेल्‍या या ‘महासंस्‍कृती महोत्‍सवा’चा प्रारंभ प्रभू श्रीरामाच्‍या पदस्‍पर्शाने पुनीत झालेल्‍या रामटेकपासून करण्‍यात आला असे सांगताना मुख्‍यमंत्री ना. श्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडियो संदेशातून या यशस्‍वी आयोजनासाठी आमदार मा. श्री. आशीष जयस्‍वाल व जिल्‍हा प्रशासनाचे अभिनंदन केले. 

अयोध्‍येत नवनिर्मित श्रीराम मंदिरात प्रभूश्रीरामाची 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्‍ठा होत असताना रामनगरी रामटेकमध्‍ये हा महोत्‍सव होणे, हा दुग्‍धशर्करा योग असल्‍याचे ते म्‍हणाले. पुढील वर्षी 22 जानेवारीला राम उत्‍सवासाठी नक्‍की येईल, अशी ग्‍वाही त्‍यांनी या व्हिडिओ संदेशातून दिली. 

रामटेकमध्‍ये गर्दीचा उच्‍चांक – आ. अॅड. आशीष जयस्‍वाल 

आमदार अॅड. आशिष जयस्‍वाल यांनी कैलाश खेर थेट अयोध्‍येतून रामटेकमध्‍ये आले असल्‍याचे सांग‍ितले. त्‍यांना ऐकायला आज नेहरू मैदान अलोट गर्दी झालेली आहे. रामटेकच्‍या इतिहासात सर्वांत मोठी ऐतिहासिक गर्दी ठरणार आहे. रामटेकवासी आणि ग्रामीण भागातील लोकांनी दिलेल्‍या उदंड प्रतिसादासाठी मी सर्वांचे आभार मानतो, असे ते म्‍हणाले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *