- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : शेफ विष्‍णू मनोहर यांच्‍या ‘श्रीराम हलवा’ची इंडिया व एशिया बुक मध्‍ये झाली नोंद 

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्‍या शुभेच्‍छा 

‘जय हनुमान’ कढईत तयार झाला 6 हजार किलोचा महाप्रसाद  

नागपूर समाचार  : एकीकडे अयोध्यात राम मंदिर अभिषेक सोहळा व श्रीरामलल्‍लाचा प्राणप्रतिष्‍ठा सोहळा सुरू असताना कोराडी येथील श्री जगदंबा संस्‍थानमध्‍ये महाराष्‍ट्राचे लाडके ‘विश्‍वविक्रमी’ शेफ विष्‍णू मनोहर यांनी सोमवारी श्रीरामभक्‍तांसाठी 6 हजार क‍िलो ‘श्रीराम हलवा’ तयार करून विश्‍वविक्रम नोंदवला. या उपक्रमाला उपमुख्‍यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत विष्‍णू मनोहर यांचे कौतूक केले. हा अतिभव्‍य व अद्भुत अशा ‘जय कढई’ मध्‍ये तयार केलेला हा महाप्रसादाचा विक्रम इंडिया बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डमध्‍ये श्री जगदंबा देवस्थानच्‍या नावाने नोंदवला जाणार आहे. 

सकाळी सातच्‍या सुमारास लाकडाच्‍या धगधगत्‍या ज्‍वाळांवर ठेवलेल्‍या ‘जय हनुमान’ कढईमध्‍ये भाजपा प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍या हस्‍ते तूप टाकून या उपक्रमाचा प्रारंभ करण्‍यात आला. त्‍यानंतर त्‍यात 700 किलो तूप, 700 क‍िलो रवा, 1000 किलो साखर, 215 किलो ड्रायफूट म‍िक्‍स आणि 22 क‍िलो विलायची पावडर, जायफळ पावडर 12 क‍िलो, पाणी 4500 लिटर, 2100 युनिट्स केळी याचा वापर करून ‘श्रीराम हलवा’ तयार करण्‍यात आला. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शि-यामध्‍ये साखर टाकून भव्‍य अशा सराट्याने कढईतील हलवा हलवत महाप्रसाद तयार करण्‍याच्‍या या प्रक्रियेतला खारीचा वाटा उचलला. त्‍यांनी शेफ विष्‍णू मनोहर यांच्‍या या उपक्रमाचे कौतुक करत अयोध्‍येत यापेक्षा जास्‍त श्रीराम हलवा तयार करून आणखी एक विश्‍वविक्रम नोंदवतील अशा शुभेच्‍छा दिल्‍या. 

देशभरात श्रीरामभक्‍तांचा उत्‍साह शिगेला पोहोचला असून कोराडीचा परिसरदेखील भगवामय झाला होता. मंदिरात अयोध्‍येतील प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण बघण्‍यासाठी हजारो हजारो भाविकांनी गर्दी केली. त्‍यांनी विष्‍णू मनोहर यांच्‍या या उपक्रमाचे कौतुक केले. अयोध्‍येतील प्राणप्रतिष्‍ठा सोहळा संपल्‍यानंतर श्री जगदंबा मंदिरात आरती करण्‍यात आली व त्‍यानंतर येथील सुमारे दीड लाख श्रीरामभक्‍तांना या महाप्रसादाचे वितरण करण्‍यात आले. 

इंड‍िया बुक व एशिया बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डचे क्‍युरेटर र्डॉ. मनोज तत्‍ववादी यांच्‍या उपस्‍थ‍ितीत प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍या हस्‍ते शेफ विष्‍णू मनोहर यांनी दोन्‍ही विश्‍वविक्रमांचे प्रमाणपत्र देण्‍यात आले. त्‍यांनी हे दोन्‍ही प्रमाणपत्र श्री जगदंबा संस्‍थानला अर्पण केले.  

‘जय हनुमान’ कढई श्रीरामचरणी करणार अर्पण 

कोराडीहून ही ‘जय हनुमान’ कढई क्रेनच्‍या सहायाने मोठ्या ट्रेलरवर चढवून अयोध्‍येला रवाना केली जाईल. अयोध्‍येत पोहोचायला या कढईला दोन दिवस लागतील. 26 जानेवारीनंतर तेथे 7 हजार किलो ‘श्रीराम शिरा’ तयार केला जाणार आहे. हा देखील एक विश्‍वविक्रम ठरणार असून तो श्रीराम मंदिर न्‍यासच्‍या नावे नोंदवला जाईल. त्‍यानंतर विष्‍णू मनोहर ही ‘जय हनुमान’ कढई श्रीराम चरणी अर्पण करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *