- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : दुसऱ्या दिवशी ‘जाणता राजाला’ नागपूरकर रसिकांचा उदंड प्रतिसाद

आजचा शेवटचा दिवस; प्रवेश सर्वांसाठी खुला, प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य

नागपूर समाचार : शिवछत्रपतींच्या जीवनपटांचा रोमांचकारी आविष्कार असणाऱ्या जाणता राजा या आशिया खंडातील सर्वात मोठ्या महानाट्याचा रविवारचा प्रयोग नागपूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गाजला. उद्या सोमवारी साडेसहा वाजता होणारा शेवटचा प्रयोग आहे. प्रयोग सर्वांसाठी खुला आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शिवचरित्रावर आधारित महानाट्य कार्यक्रम राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहे. नागपूरच्या यशवंत स्टेडियमवरून काल शनिवारी शिवछत्रपतींच्या जीवनपटांवर आधारित महानाट्य जाणता राजा या प्रयोगाचा राज्यस्तरीय शुभारंभ हजारोंच्या उपस्थितीत करण्यात आला. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यातील जिल्ह्यामध्ये हा प्रयोग होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते काल हा शुभारंभ झाला.

शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या दिग्दर्शनात या नाट्यकृतीची निर्मिती झाली होती. आतापर्यंत देशात व विदेशात शेकडो प्रयोग महानाट्याचे झाले आहे. शिवछत्रपतींच्या पूर्वीचा महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये तत्कालीन परिस्थितीत माजलेली अनागोंदी, शिवरायांचा जन्म, तरुण वयात स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ, स्वकियांचा बिमोड, त्यांची प्रशासनावरची जरब, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर केलेला हल्ला,आग्र्यावरून झालेली सुटका, शिवरायांचा राज्याभिषेक, अशा कितीतरी घटनांना उजाळा देणारे हे नाट्य, खिळून ठेवणारे संवाद, कलाकारांचा उच्च प्रतीचा अभिनय, दृश्यांमधील सातत्य व सहजता, मोठे फिरते रंगमंच,जागतिक दर्जाचे नेपथ्य,प्रकाशयोजना,भव्य सेट, नयनरम्य आतीषबाजी, विविध परंपरा, लोककलांचे सादरीकरण, याची डोळा बघण्यासारखा हा नाट्यप्रयोग मोफत व सर्वांसाठी जिल्हा प्रशासनाने खुला केला आहे.

 रविवारी मोठया संख्येने नागपूरकरांनी व जिल्हयाच्या अनेक भागातून नागरिकांनी या नाटय प्रयोगाला गर्दी केली होती. बरोबर साडेसहा वाजता जिल्हा, मनपा व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरती केल्यानंतर प्रयोगाला सुरुवात झाली. मोठया संख्येने कुटुंबासह नागरिक या प्रयोगाला उपस्थित होते.

सोमवारचा शेवटचा प्रयोग सर्वांसाठी खुला

जाणता राजा या प्रयोगाच्या आजच्या उद्घाटन सोहळ्यानंतर उद्यापासून हा प्रयोग सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने उद्यापासून प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्याचे ठरवले असून प्रवेशिकांची गरज असणार नाही. त्यामुळे उद्या सोमवारी प्रयोगाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी शिवचरित्रावरील आयोजित या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब आनंद घ्यावा

दरम्यान, नागपूर जिल्हा व महानगरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या नाटकाला रविवारी प्रतिसाद दिला सोमवारचा शेवटचा प्रयोग असून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका व अन्य सर्व आस्थापना वरील कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब या नाट्यप्रयोगाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. तसेच महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने या प्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *