- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : दुर्मिळ ‘लोकराज्य’ दालनास उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर समाचार : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने विधानभवन परिसरात उभारण्यात आलेल्या दूर्मिळ लोकराज्य अंक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकराज्य प्रदर्शनातील विविध दुर्मिळ अंकाविषयी लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ सनदी अधिकारी यांच्याकडून कौतुकाची थाप व महत्वपूर्ण सूचना प्राप्त होत आहेत.  

 मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॅा. नीलम गोऱ्हे यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार, सनदी अधिकारी व नागरिकांनी या दालनास भेट दिली आहे. बहुतेकांनी अभिप्राय नोंदवहीत आपले विचार मांडून या दालनातील दुर्मिळ लोकराज्य अंकांची उत्तम मांडणी व वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले अंक याविषयी तसेच आगामी लोकराज्य अंकांमध्ये अंतर्भुत करावयाच्या विषयांबद्दल सुचनाही केल्या आहेत.  

प्रातिनिधिक अभिप्रायात माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी लोकराज्य दालनाद्वारे मांडण्यात आलेल्या अंकांतून देशातील महत्वाच्या नेत्यांच्या जीवनपटाचा ठेवा वाचकांसमोर आणल्याची बोलकी प्रतिक्रिया नोंदवली आहे. आमदार सर्वश्री ॲड. अशोक पवार, सुरेश भोळे, शिरीष चौधरी आदींनीही प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. 

शिवराज्यभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्ताने विशेषांक काढावा, अशी सूचना करीत लोकराज्यचे दुर्मिळ अंक या दालनात पाहता आल्याने आनंद झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी नोंदवली आहे. 

लोकराज्य दालनास आज भेट देणाऱ्या मान्यवरांनी गजबजून गेल्याचे चित्र दिवसभर दिसून आले. अधिवेशन संपेपर्यंत विविध मान्यवरांना या दालनास भेट देऊन महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय असा वैविध्यपूर्ण वारसा अनुभवता येणार आहे. 

‘लोकराज्य’ दालनाविषयी

प्रदर्शनात 1964 पासूनचे दुर्मिळ अंक ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध विशेषांकही येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि हा अंक जास्तीत-जास्त जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी ‘लोकराज्य’प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. लोकराज्य’ मासिक माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत प्रकाशित होत असून त्यास सात दशकांची परंपरा लाभली आहे. हे मासिक राज्याचा जडणघडणीचा साक्षीदार ठरले आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय, माहितीपूर्ण विशेषांक विविध क्षेत्रातील माहितीचा खजिना म्हणून लोकराज्य ओळखले जाते. विश्वासार्ह माहितीमुळे हे मासिक सर्वसामान्य वाचकांसोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *