- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते ‘विदर्भातील संत’ ग्रंथाचे थाटात प्रकाशन

विदर्भातील संत युगानुकूल, समाजोपयोगी व युवापिढीसाठी मार्गदर्शक

नागपूर समाचार : संत साहित्यातून प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार होत असतात. त्यामुळे प्रत्‍येक पिढीला हे मार्गदर्शक ठरते. ‘विदर्भातील संत’ हा ग्रंथ त्‍यामुळेच युगानुकूल, समाजोपयोगी आणि युवापिढीसाठी मार्गदर्शक असा ठरेल, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केला.

विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र डोळके यांच्या ‘विदर्भातील संत’ या ग्रंथाचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात शुक्रवारी सकाळी पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि.सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते तर प्रख्यात संशोधक डॉ. म. रा. जोशी यांचीही यावेळी उपस्‍थ‍िती होती.

नितीन गडकरी यांनी विदर्भातील संतांवर संशोधनपर पुस्तक काढल्याबद्दल डॉ. राजेंद्र डोळके यांचे अभिनंदन केले. पारडीमध्ये उड्डाणपुलाच्या प्रत्येक खांबावर विदर्भातील संतांचे चित्र, परिचय आणि माहिती द्यावी, असा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यात डॉ. राजेंद्र डोळके यांच्या पुस्तकाचा लाभ होणार असून माहिती तपासून घेणे सोपे होणार आहे, असे ते म्हणाले.

याशिवाय, आजची नवीन पिढी पुस्तके वाचत नाही ही बाब लक्षात घेऊन तुकाराम गाथा, ग्रामगीता असे संत साहित्य डिजिटल करावे असे त्यांनी विदर्भ साहित्य संघाला सुचविले. पूर्वीच्या काळी महाल, इतवारी भागात होत असलेल्या विविध संतांच्या कीर्तन -प्रवचनाच्या आठवणींना देखील गडकरी यांनी उजाळा दिला.

या पुस्तकात केवळ संतांची माहिती नसून संत परंपरेचे वैभव दिसून येते. संतपरंपरा हे व्यक्ती चित्रण नसून मानवी संस्कृतीचे अद्भुत असे दर्शन आहे, असे मत ज्येष्ठ संशोधक डॉ. म. रा. जोशी यांनी व्यक्त केले. भक्त आणि देवांमधला संवाद जोपासण्याची परंपरा कायम ठेवणारे संत असल्याचे ते म्हणाले. संताची मांदियाळी या देशाला लाभली आहे. प्रत्येक प्रदेशात जातिभेद दूर सारून संतांनी कार्य केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

खेडोपाडी किंवा मोठ्या गावी सुद्धा मानवी जीवनमूल्यांचा अर्थ संतांनी समजावला आहे. डोळके यांनी त्यांच्या पुस्तकात माहितीच्या आधारे लेखन केल्याचे कौतुक करीत संतचरित्र लिहिताना सुद्धा त्यांची संशोधन वृत्ती दिसून येते, असे गौरवोद्गार डॉ. जोशी यांनी काढले. अध्‍यक्षीय भाषणातून प्रदीप दाते यांनी डॉ. डोळके यांच्‍या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून पुस्तकाबद्दल माहिती देताना डॉ. राजेंद्र डोळके यांनी हे पुस्तक म्हणजे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संतांविषयीच्या लेखांचा संग्रह असल्याचे सांगितले. आपला देश आणि विदर्भ ही संतांची भूमी आहे असे सांगत धर्म, शौर्य, साहित्य, सौंदर्य, विद्वत्ता हे सर्व संतसाहित्यात दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

आपल्या पूर्वी देखील अनेकांनी संतांबद्दल माहितीपूर्ण पुस्तके लिह‍िल्याचे सांगून आपण हे पुस्तक वडिलांनी केलेल्या संशोधनाच्या मदतीने लिहिल्यामुळे त्‍यांना ते अर्पण केल्याचे ते म्हणाले. गडकरी हे केवळ राजकारणी आणि सामाजिक व्यक्तिमत्व नसून संत साहित्याचे व्यासंगी असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी आवर्जून केला.

विदर्भातील संत परंपरेचा व त्यांच्या कार्याचा उल्लेख असलेल्या या ग्रंथाची निर्मिती साहित्य प्रसार केंद्रातर्फे करण्यात आली आहे. कार्यक्रमाला निवृत्त न्या. विकास सिरपूरकर, कवी, अनुवादक प्रफुल्ल शिलेदार, वि. सा. संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, डॉ. उदय गुप्ते यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विवेक अलोणी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *