- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : श्रीसुक्त पठणाद्वारे खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवात स्‍त्रीशक्तीचा जागर

1000 हून अधिक मह‍िलांनी पावसात केली 16 आवर्तने

नागपूर समाचार : अवकाळी आलेल्‍या कार्यक्रम स्थळ जलमय झालेले असताना 1000 हून अधिक मह‍िलांनी ईश्‍वर देखमुख शारी‍रिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या परिसरात सुरू असलेल्‍या खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवाच्‍या पाचव्‍या दिवशीच्‍या सकाळच्‍या सत्रात श्रीसुक्‍त पठण करीत स्‍त्रीशक्‍तीचा जागर केला. 

खासदार सांस्‍कृत‍िक महोत्सव सम‍ितीच्‍या ‘जागर भक्‍तीचा’ या उपक्रमांतर्गत मंगळवारी श्रीसूक्त पठणाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाला राष्ट्रसेव‍िका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे, संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी, ग‍िरीश व्‍यास, श्रीमती व्यास, अहल्या मंदिरच्या अध्यक्ष शिल्पा जोग, मूळ रशियन असलेल्‍या कझाक‍िस्‍तानच्‍या रहिवासी स्वेतलाना बगडिया यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात केली.

काल रात्रीपासून शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. सोबत, वातावरणात गारठा वाढला होता. अशाही स्थितीत भाविक मह‍िलांनी ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पटांगणांवर सकाळी 6 वाजेपासून जमायला सुरुवात केली. पावसाचा जोर वाढल्‍यानंतरही 1000 हून अधिक महिलांनी अतिशय शांत व संयम‍ितपणे एका सुरात, एका लयीत श्रीसुक्‍ताची 16 आवर्तने करीत स्‍त्रीशक्‍तीची प्रचिती दिली. माई खांडेकर व भग‍िनी मंडळाच्‍या सहयोगाने वे. शा. सं. देवेश्वर आर्वीकर गुरुजी, अद्वैत आर्वीकर, शैलेश राजवाडे, चिन्मय साळसकर यांनी सुरुवातीला विश्वकल्‍याणाचा संकल्प सोडला. त्‍यानंतर सुमारे एक तास नैसर्गिक संकटावर मात करत मंडपात उपस्‍थ‍ित शक्तिरुपिनी मह‍िलांनी ‘दुर्गे दुर्घट भारी’ असल्‍याची प्रचिती दिली. स्‍वेतलाना बगड‍िया यांनीदेखील श्रीसुक्‍त पठणात सहभाग नोंदवला. 

उपक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी संयोज‍िका माया हाडे, दीपाली वाकडे, विवेक गर्गे, नंदा भोयर यांचे सहकार्य लाभले. रेणुका देशकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *