- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपुर समाचार : विश्‍वशांतीसाठी खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवात झाले श्रीरुद्र पठण

नागपुर समाचार : ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पटांगणात सुरू असलेल्‍या खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या चौथ्‍या दिवशी सकाळी विश्‍वशांतीसाठी श्रीरुद्र पठण करण्‍यात आले. प्रसन्‍न वातावरणात झालेल्‍या श्रीरुद्रातील मंत्रोच्‍चाराने परिसरातील वातावरण भारावून गेले. 

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव सम‍ितीच्‍यावतीने महोत्‍सवाच्‍या कालावधीत दररोज सकाळच्‍या सत्रात ‘भक्‍तीचा जागर’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी भगवान श्री शंकराचे श्रीरुद्र पठण करण्‍यात आले. प्रजापिता ब्रम्‍हकुमारीच्‍या रजनी दीदी, सामाजिक कार्यकर्ती कांचनताई गडकरी, चेतना टांक, खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव सम‍ितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, ऋतुजा गडकरी यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन व भगवान श्री शंकराच्‍या प्रतिमेला माल्‍यार्पण करण्‍यात आले.

वे.शा.सं. देवेश्‍वर आर्वीकर गुरुजी यांच्‍या नेतृत्‍वातील अद्वैत आर्वीकर, शैलेश राजवाडे, चिन्‍मय साळस्‍कर आणि सौरभ जोशी या पुरोहितांनी श्रीरुद्र पठणाला प्रारंभ केला. सुरुवातीला त्‍यांनी शांती मंत्राचा उच्‍चार करून विश्‍वशांतीसाठी संकल्‍प केला. ‘ओम नमो भगवते रुद्राय’ या मंत्राने त्‍यांनी पठणाला सुरुवात केली. मंडपात मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित भाविक या उपक्रमात सहभागी झाले. सुमारे एक तास चाललेल्‍या या पठणाचा समारोप भगवान श्री शंकराच्‍या आरतीने झाला. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. संयोजिका रोहिणी कोमेजवार, मधू राऊत, माया हाडे यांचे उपक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *