- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : जिल्ह्यात 13 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची सुरुवात

  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
  • विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

नागपूर समाचार : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत राज्यातील ५११ ग्रामपंचायतींमध्ये आज दुपारी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यापैकी नागपूर जिल्ह्यात 13 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील जलालखेडा, धापेवाडा, पाटणसावंगी, येरखेडा, वायगाव (घोटुर्ली), हरिश्चंद्र वेळा, कान्होलीबारा, अरोली, मांढळ, देवलापार, टेकाडी (कोयला खदान), नांद आणि कोंढाळी या ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात आली आहे.

ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. 

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी वेळाहरी येथून, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर हिंगणा तालुक्यातील कान्होली बारा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा धापेवाडा, तर अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण कोंढाळी येथून,येरखेडा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले, नागपूर ग्रामीणमध्ये बेला हरिश्चंद्र गावात उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद विपुल जाधव,जलालखेडा येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाने, पारशिवनी येथे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर, देवलापार येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, पाटणसावंगी येथे प्रकल्प संचालक वर्षा गौरकार, नांद येथे कार्यकारी अभियंता बंडु सयाम, मांडळ येथे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कविता मोरे,आरोली येथे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, उमरेड येथे जिल्हा कृषी अधिकारी संजय पिंगट यांच्या उपस्थितीत आज या केंद्राचे उद्घाटन झाले. 

केंद्रावर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर लोकप्रतिनिधी तसेच महविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनी या कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनात मोठया संख्येने उपस्थित होते.

केंद्रात काय असणार ?

कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र असे ब्रीद घेऊन ग्रामीण भागातील तरुणांना कृषिपूरक, पारंपरिक व व्यावसायिक कौशल्य क्षेत्रातील प्रशिक्षण मिळणार आहे. पी.एम. विश्वकर्मा योजनेसाठी ही विकास केंद्रे उपयुक्त ठरणार आहे. 

 केंद्रामध्ये एकावेळेस जास्तीत जास्त 2 जॉब-रोल्सचे प्रशिक्षण प्रदान करण्यात येईल. अल्प कालावधीत (साधारणत: ३ महिने) पूर्ण होऊ शकणारे (किमान २०० व कमाल ६०० तास प्रशिक्षणाचा कालावधी) अभ्यासक्रमाची निवड जिल्हा, कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत करण्यात येईल.

प्रत्येक केंद्रात वर्ष २०२३-२४ करिता एकूण १०० उमेदवारांचे प्रशिक्षणाचे उद्दिष्ट देण्यात येईल. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रामध्ये किमान ३० टक्के महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. या केंद्रातून दरवर्षी सुमारे ५० हजार युवक-युवती कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे रोजगारक्षम होतील.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर हे हिंगणा तालुक्यातील कान्होली बारा येथून सहभागी झाले होते. कौशल्यावर आधारित मनुष्यबळ निर्माण व्हावे यासाठी या केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. कौशल्य विकास केंद्रांचा लाभ घेऊन रोजगारक्षम होण्याचे आवाहन करीत उपस्थित तरुणाईला पुढील वाटचालीस जिल्हाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *