- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : यशवंत स्टेडियमवर योग दिनाचे आयोजन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

आंतरराष्ट्रीय योग दिन : चिमुकले ते वृद्धांचा उत्साही सहभाग

नागपूर समाचार : जिल्हा स्तरावर आंतरराष्ट्रीय योग दिनाचे दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्मरणीय आयोजन करण्यात आले.पांढरा टी-शर्ट व पांढरा पॅन्ट अशा पोशाखामध्ये  यशवंत स्टेडियमला पहाटेच चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत असे सर्वच स्तरातील योग साधक उत्साहात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

आज जगभरात नववा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. ‘हर घर आंगण योग ‘ ही टॅगलाईन आयुष मंत्रालयाने निश्चित केली आहे. देशपातळीवर जबलपूर येथे भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन  कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राज्यस्तरावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत योग दिनाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. तर जिल्हास्तरावर जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जागतिक स्तरावर योगाला मान्यता मिळाली आहे. निरोगी आयुष्यासाठी योग साधना आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ संदेश यावेळी दाखविण्यात आला. त्यानंतर विविध योगासने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

योगदिन कार्यक्रमात महानगरपालिका, आयुष व आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, एनएसएस, एनसीसी, पोलीस, योग संस्थांशी संबंधित योगसाधक सहभागी झाले होते.

जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आ. प्रवीण दटके, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. मनोज कुमार सूर्यवंशी, नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे राम खांडवे आदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *