- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : कलेतून अर्थार्जन होणे महत्‍त्‍वाचे – डॉ. विकास महात्‍मे

नटराज आर्ट अँड कल्‍चर सेंटरमध्‍ये ‘चित्रार्थ – 2023’ ला प्रारंभ  

नागपूर समाचार : एखादा कलाकार कलात्‍मकतेने एखादी कलाकृती तयार करतो, तिच्‍या निर्मितीसाठी कठोर मेहनत घेतो. पण ती कला लोकांपर्यत पोहोचवण्‍यात तो कमी पडतो. कलेतून अर्थार्जन करण्‍यासाठी त्‍याचे उत्‍तम प्रमोशन कसे करायचे, याचे उत्‍तम उदाहरण ‘चित्रार्थ’ मध्‍ये नवोदित कलाकारांनी प्रस्‍तुत केले आहे, अशा शब्‍दात माजी राज्‍यसभा सदस्‍य पद्मश्री डॉ. विकास महात्‍मे यांनी कलाकारांचे कौतुक केले.

धरमपेठ एज्‍युकेशन सोसायटीच्‍या नटराज आर्ट अँड कल्‍चर सेंटरच्‍यावतीने नटराज आर्ट गॅलरीमध्‍ये बुधवारी वार्षिक कला प्रदर्शनी ‘चित्रार्थ – 2023’ चे डॉ. विकास महात्‍मे यांच्‍या हस्‍ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाला धरमपेठ एज्‍युकेशन सोसायटीचे अध्‍यक्ष अॅड. उल्‍हास औरंगाबादकर, उपाध्‍यक्ष रत्‍नाकर केकतपुरे, सचिव मंगेश फाटक, सुरेश देव, दीपक दुधाने, आनंद आपटे, नटराज आर्ट अँड कल्‍चर सेंटरचे प्राचार्य डॉ. रव‍िंद्र हरिदास व प्रदर्शनी प्रमुख प्रा. मौक्तिक काटे यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

वैविध्‍यपूर्ण कला, संस्‍कृतीने नटलेल्‍या देशातील लोकसंस्‍कृती जनमानसापर्यंत पोहोचवण्‍याचे प्रदर्शनी हे उत्‍तम माध्‍यम असून नटराजचे शिक्षक व विद्यार्थी कलेकडे बघण्‍याच्‍या दृष्‍टीकोन बदलण्‍यात यशस्‍वी ठरू शकतात, असे डॉ. महात्‍मे म्‍हणाले.

‘मोहेंजोदरो, हडप्‍पा आणि भारतीय संस्‍कृती’ अशी संकल्‍पना असलेल्‍या या प्रदर्शनीच्‍या दर्शनी भागात उभारलेली हडप्‍पा संस्‍कृतीची साक्ष देणारी डाि‍न्‍सग गर्ल लक्षवेधक ठरली. बीएफए व एमएफए अभ्‍यासक्रमाचे 110 विद्यार्थ्‍यांनी अप्‍लाईड आर्ट, पेंटींग व स्‍कल्‍पचर आदी कला प्रदर्शित केल्‍या असून वारली, गोंड आर्ट, मुरिया पेंटींग, पिठोरा पेंटींग सारख्‍या भारतीय आदिम चित्रकारीचा यात समावेश आहे. विद्यार्थ्‍यांनी तयार केलेले अजंता-एलाराचे म्‍युरल्‍स, विविध माध्‍यमातील जाहिराती, कॅरिकेचर, इल्‍युस्‍टेशन, स्‍टोन आर्ट, मूर्तीकला बघून उपस्‍थ‍ित थक्‍क झाले.

डॉ. रविंद्र हरिदास यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी डॉ. सदानंद चौधरी, धृपद गाडे, तुषार राऊत, खुशबू चौहाण, डॉ. निलेश चौहाण असे अनेकांचे सहकार्य लाभले. ही कला प्रदर्शनी 26 ते 29 एप्रिल दरम्‍यान दुपारी 4 ते 8 यावेळेत सर्वांसाठी खुली राहणार आहे. कलाप्रेमींनी प्रदर्शनीला अवश्‍य भेट द्यावी, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *