- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : भार्गवकवच पठणाची फलप्राप्ती फार मोठी – प.पू सद्गुरुदास महाराज

नागपूर समाचार : भार्गवकवच पठणाची फलप्राप्ती फार मोठी आहे. याचे पठण श्रद्धापूर्वक करावे तसेच, यावर्षी येणाऱ्या अधिक मासात याचे अवश्य पठण करावे, असे प.पू धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांनी म्हटले. भगवान श्री परशुराम शोध मंडळ आणि संस्कृत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रीभार्गवकवचम् सहपठण’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

सृष्टीच्या आरंभापासून सूर-असूर संघर्षात सूर म्हणजेच सज्जनशक्तीच्या रक्षणासाठी अनेक रक्षाकवचं रचली गेली. देवी पार्वतीने विचारले असता भगवान शंकरांनी ही सांगितली व पुढे ती मंत्रशक्तीरुपी कवचे मुखोद्गत होत पुढच्या पिढीला सोपवली गेली. आजही त्यातील दिव्य शक्ती कायम आहे हे त्यांनी स्वतःचे अनुभव सांगत पटवून दिले. यापैकी एक म्हणजे भार्गव कवच आहे. याचे पठण करताना चिकित्सक बुद्धी बाजूला ठेवून भगवान परशुरामांवर आत्यंतिक श्रद्धा ठेवून, मनात अतिशय तळमळ घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने करावे. संकल्पपूर्वक असे हे पठण आपल्याला ज्ञानप्राप्ती व आध्यात्मिक प्रगती असे अनेक लाभ करवून देईल. तसेच, लौकिक, पारलौकिक संकटातून आपली सुटका करेल, असा विश्वास दिला.

भगवान परशुराम शोध मंडळाचे प्रभाकर घारपुरे व संस्कृत सखी सभेच्या अध्यक्षा डॉ विजया जोशी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी अश्विनी पिंपळापुरे यांनी शारदास्तवन म्हटले. डॉ विणा गानू यांनी सामूहिक पठणाचे नेतृत्व केले. प्रास्ताविक विजया जोशी यांनी केले तर आभारप्रदर्शन शिल्पा वराडे यांनी केले. सूत्रसंचालन वैदेही केळकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. गोरक्षण सभागृहातील या कार्यक्रमात पार मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *