- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : जलसाठ्याचे प्रदूषणापासून संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य आवश्यक – रवींद्र ठाकरे

जलजागृती सप्ताहाचा समारोप 

प्रदूषणामुळे जलसाठातील पाणी दूषित होत असून नदीसह जलसाठे संरक्षित करणे ही काळाची गरज आहे. लोकसहभागाने जलसाठे संरक्षित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

जलसंपदा विभाग, भारतीय जलसंसाधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जलजागृती सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम बचत भवन येथे आयोजित करण्यात आला, त्यावेळी श्री ठाकरे बोलत होते.

यावेळी निरीचे संचालक डॉ. अतुल वैद्य, माहिती संचालक हेमराज बागुल, भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष संजय वानखेडे, जल अभ्यासक डॉ. प्रविण महाजन, गोसीखुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अंकूर देसाई, जिल्हा समन्वयक पदमाकर पाटील, बानाईचे अध्यक्ष अरविंद गेडाम उपस्थित होते.

पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होत असल्यामुळे शुद्ध जल मिळणे कठीण होत आहे त्यामुळे जलसाठे संरक्षित करणे ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचे सांगताना रवींद्र ठाकरे म्हणाले पाणी प्रदुषणामुळे पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व प्रजाती सुद्धा नष्ट होत आहेत त्यासाठी शुध्द पाणी कसे टिकवून ठेवता येईल, यावर चिंतन होणे गरजेचे आहे.

पाण्याची बचत काळाची गरज असून विविध उपायाद्वारे पाण्याची बचत तसेच उपलब्ध पाण्याचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

जलसंवर्धनासाठी उपलब्ध पाण्याचे साठे संरक्षित करून पावसाचे पाणी साठविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निरीचे संचालक अतुल वैद्य यांनी सांगितले.

आजच्या काळात नदी प्रदुषण हा मोठा विषय आहे. त्यासाठी जलजागृती होणे गरजेचे आहे. कोणत्याही कार्यक्रमात पाण्याचा अपव्यव टाळला पाहिजे. पाण्याच्या बचतीसाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासोबत नागनदी व विदर्भातील इतर नद्यांचे प्रदुषण रोखले पाहिजे. विदर्भातील नद्यांचे प्रदूषण थाबविण्यासाठी निरीतर्फे सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांच्या मनात जलसंवर्धनासाठी लोक चळवळ उभी करतानाच प्रत्येकाच्या मनात पाणी बचतीबद्दल भावना तयार करणे आवश्यक आहे. पाण्याला मुल्य नाही म्हणून बचत नाही, अशी सर्वसाधारण जनतेची धारणा आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्षण जाणवते. यासाठी जलजागृती करण्याची निरंतन सवय आपण लावली पाहिजे. जलजागृतीचे कार्यक्रम नियमित झाले पाहिजे तरच जनजागृती होईल, असे माहिती संचालक हेमराज बागुल यांनी सांगितले.

जलजागृतीसाठी प्रबोधन हा उपक्रम अनेक पातळीवर राबविला पाहिजे. जलजागृती लोकचळ झाली पाहिजे तरच पाण्याची बचत होईल, असेही त्यांनी सांगितले.

जलपूजन व दीप प्रज्वलन करण्यात आहे प्रास्ताविक संजय वानखेडे यांनी केले. जलजागृती सप्ताहानिमित्त राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाविषयी माहिती त्यांनी दिली. यावेळी पद्माकर पाटील यांनी जलजागृती सप्ताहाविषयी राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस देण्यात आले. संचालन विजय जथे यांनी केले तर आभार रा.ना. ढुमणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *