नागपूर समाचार : हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीस प्रतिबंध करुन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्या. सोबतच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार समाजातील बाधीतांना अर्थसहाय त्वरीत देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.
जिल्हा नियंत्रण व दक्षता समिती आणि सफाई कर्मचाऱ्यांबाबत आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विजय आनंद, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, समितीचे सदस्य तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबतचे कोणतेही प्रकरण जास्त काळ प्रलंबित ठेवू नये, त्याबाबत योग्य कार्यवाही करुन संबंधितांना त्यांचे अर्थसहाय द्यावे. सफाई कर्मचाऱ्यांना घरकुल योजनेचा लाभ द्या. तसेच योजनेचे डाक्युमेंटेशन योग्य प्रकारे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरील समितीची बैठक घेऊन अहवाल नियमित पाठवावा. सफाई कर्मचाऱ्यांना सफाई करण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करुन द्या. या योजनेत प्रथम पाच व्यक्तींना सहभागी करुन योजना राबवा, तसेच प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेमधून त्यांना घरकुल देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.



