- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर समाचार : धर्मकार्यासाठी प्रत्‍येकाने स्‍वत:ला वाहून घ्‍यावे – डॉ. मोहनजी भागवत

श्री सद्गुरुदास महाराजांना “धर्मभास्कर”सन्मान प्रदान; ईश्‍वरनिष्‍ठांची मांदियाळी आणि मंत्रोच्‍चारात पार पडला सोहळा

नागपूर समाचार : सद्गुरूगुरूदास महाराजांना त्‍यांचे सेवाकार्य आणि परोपकरी वृत्‍तीचे फळ मिळालेले आहे. संकेश्‍वर पीठाने त्‍यांचा ‘धर्मभास्‍कर’ सन्‍मान देऊन उचित गौरव केला. त्‍यांचे सर्व संकल्‍प फळाला येणार असून त्‍याचा फायदा आपल्‍याला व देशाला होणार आहे. सद्गुरूदास महाराजांचे धर्मकार्य पुढे न्‍यायचे असेल आणि त्‍यांचा उचित गौरव करायचा असेल तर प्रत्‍येकाने धर्मासाठी स्‍वत:ला वाहून घेतले पाहिजे, असे आवाहन राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी काढले.

संकेश्वर पीठाचे जगद्गुरु पूज्यपाद शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती यांच्‍यातर्फे श्री सद्गुरुदास महाराज यांना ‘धर्मभास्कर’ हा सन्मान मंत्रोच्‍चार, शंखनाद व टाळ्यांचा कडकडाट बुधवारी प्रदान करण्‍यात आला. सुरेश भट सभागृहात झालेल्‍या या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत होते. मंचावर काशीपिठाचे गणेशशास्‍त्री द्राविड, प्रज्ञाचक्षु मुकुदंकाका जाटदेवळेकर, बाबा महाराज तराणेकर, कर्नाटकामधील कंपाली पीठाचे आचार्य श्री नारायणविद्या भारती, अमृताश्रम स्‍वामी महाराज, कविकुलगुरू कालिदास संस्‍कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्‍ना, संत वाडमयाचे अभ्‍यासक डॉ. म. रा. जोशी यांची उपस्‍थ‍िती होती.

डॉ. मोहन भागवत यांनी देशाच्‍या आक्रमण इतिहासाचे वर्णन करताना ईश्‍वरनिष्‍ठांच्‍या मांदियाळीमुळे भारत अपराजित राहिला असे उद्गार काढले. कालोघात नष्‍ट झालेल्‍या देशाच्‍या सत्‍वाला पुनरुज्‍जीवित करण्‍यासाठा वैदिक ज्ञानाचे शिक्षण देण्‍याची गरज असल्‍याचे ते म्‍हणाले. धर्माची व्‍याख्‍या करताना ते म्‍हणाले, कुठलीच गोष्‍ट धर्माशिवाय चालत नाही. सर्व युगात धर्माची आवश्‍यकता असून धर्म नसेल तर सृष्‍टी-नियम राहणार नाहीत. धर्म हा आचरणाने वाढतो. आपल्‍या आचरणावर दृढ राहून धर्मरक्षणाचे कार्य प्रत्‍येकाने केले पाहिजे, असे ते म्‍हणाले.   

यावेळी सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती यांनी ध्‍वनिचि‍त्रफितीच्‍या माध्‍यमातून सद्गुरूदास महाराजांना आशीर्वचन दिले तर प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर व अमृताश्रम स्‍वामी यांनीदेखील महाराजांना आशीर्वाद दिले. डॉ. मधुसूदन पेन्‍ना यांनी धर्म ही भारतीय संस्‍कृतीतील अत्‍यंत महत्‍वपूर्ण बाब असून तो व्‍यक्‍ती, समाज, राष्‍ट्र आणि विश्‍वाला जोडतो, असे उद्गार काढले. 

यावेळी कार्यक्रमाला उपस्‍थ‍ित ह.भ.प.श्री गोविंद महाराज (पाथर्डी), श्री दत्तगिरी महाराज (मरडसगाव ),योगश्री कालिदास महाराज (गुंज,परभणी) श्री बब्रू महाराज (तेलंगणा), श्री अवधूत गिरी महाराज (उत्तरप्रदेश), श्री नागेशशास्त्री अंबुलगे नंदी महाराज (तुळजापूर), ह.भ.प.भागवत महाराज(लखनौ), श्रध्देय राधिकानंद सरस्वती (पुणे), श्री राहुल फाटे(नाशिक), श्री छोटे बालकदास माहात्यागी महाराज (धर्मापुरी-वय१००वर्षे), हिमालय योगी श्री सदानंदगिरी महाराज (वय १०७वर्षें), श्री भगिरथी महाराज (नागपूर) यांचेही पूजन करण्‍यात आले. 

प्रास्‍ताविक गोविंद महाराज जाटदेवळेकर यांनी केले तर भूषणशास्‍त्री आर्वीकर यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्‍मीता महाजन यांनी केले. अमर कुळकर्णी यांनी श्रीगुरूमंदिर परिवार गीत सादर केले. ब्रम्‍हपुरी केंद्राच्‍या बालकांनी दिंडी सादर केली तर तेल्‍हारा येथील सेठ बंसीधर विद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी समारोपीय गीत सादर केले.

अखेरच्‍या श्‍वासापर्यंत धर्मकार्य घडावे – सद्गुरूदास महाराज

कलियुगात धर्म लयाला जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत धर्म टिकवायचा असेल तर नामसंकीर्तन आणि गुरुभक्‍ती आवश्‍यक आहे. मला श्री दत्‍तगुरू यांच्‍यारूपाने गुरू लाभले. प.पू. विष्‍णूदा महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि प.पू. गोळवलकर गुरूजी हे तीन गुरू माझ्यासाठी दत्‍तगुरू स्‍वरूप असून त्‍यांच्‍याकडून निग्रह, निर्धार, निष्‍ठा मी शिकलो, असे धर्मभास्‍कर सद्गुरूदास महाराज म्‍हणाले. संकेश्‍वर पीठाने अत्‍यंत प्रेमाने धर्मभास्‍कर उपाधी देऊन सन्‍मान केल्‍यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी पार पडण्‍याचे व अखेरच्‍या श्‍वासापर्यंत माझ्या हातून धर्मकार्य घडत राहावे, असे आशीर्वाद येथे उपस्थित संत, महंत, आचार्यांनी मला द्यावे असे भावोद्गार सद्गुरूदास महाराजांनी ‘धर्मभास्‍कर’ सन्‍मान स्‍वीकारल्‍यानंतर काढले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *