- Breaking News, नागपुर समाचार, शिक्षा

नागपुर समाचार : सी पी अँड बेरार महाविद्यालयाद्वारे प्रकाशित पुस्तकाचे मा. राज्यपालांच्या हस्ते विमोचन

सी पी अँड बेरार महाविद्यालयाद्वारे प्रकाशित पुस्तकाचे मा. राज्यपालांच्या हस्ते विमोचन

नागपूर समाचार : सीपी अँड बेरार महाविद्यालय नागपूर द्वारा प्रकाशित ‘एनईपी -2020 – ए रोडमॅप टू ट्रान्‍सफॉर्मेशन’ या पुस्तकाचे विमोचन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम श्री. भगत सिंग जी कोश्‍यारी यांच्या हस्ते आज दि. 3.1.23 रोजी करण्यात आले. 

याप्रसंगी आपले मत व्यक्त करताना मा. राज्यपाल म्हणाले की, आज भारतात सर्वत्र इंग्रजी माध्यमात शिकवले जाते. पण आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षण दिले जाणार आहे. ही बाब अत्यावश्यक होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनात वाढ होऊन त्यांची शिक्षणाप्रती रूची वाढेल. त्याबरोबरच नैतिक शिक्षणाची जोड देण्यात आली तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होतो. पायवा जर मजबूत असेल तर मोठी इमारत उभी राहू शकते. त्यामुळे सर्व शैक्षणिक पद्धतीमध्ये नैतिक शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

हे पुस्तक समाजातील ज्या ज्या घटकांचा शिक्षणाशी संबंध येतो, त्या सर्व घटकांसाठी तयार करण्यात आले आहे. त्‍यामुळे या पुस्‍तकामध्‍ये विद्यार्थी, प्राध्यापक, कुलगुरू, माजी कुलगुरू, नियोजन समिती सदस्य, नवीन शैक्षणिक धोरण समितीचे सदस्य ई. चे विचार प्रकाशित करण्यात आले आहेत, अशी माहिती पुस्तकाचे मुख्य संपादक डॉ. मिलिंद बारहाते यांनी दिली. 

या पुस्तकामध्ये डॉ. टी. व्‍ही. कुट्टीमणी, कुलगुरू केंद्रीय आदीवासी विद्यापीठ आंध्रप्रदेश तसेच, नवीन शैक्षणिक धोरण 2020 समितीचे अध्यक्ष, नियोजन समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्ते डॉ. हरिश्चंद्र सुखदेवे, रातुम नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटन मंत्री मुकुलजी कानेटकर, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, एसएनडीटी विद्यापीठ मुंबईच्या कुलगुरू डॉ. उज्‍ज्वला चक्रदेव, होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन टीआयएफआर मुंबईचे प्रो. डॉ. सुधाकर आगरकर, प्रसिद्ध शिक्षणतज्ञ सीएओ एनआयटी डॉ. प्राची साठे, मुंबई, प्रसिद्ध शैक्षणिक सल्लागार दिल्ली येथील प्रा. मनीष झा, उत्तराखंड येथील विद्यार्थी नेता राजन जोशी आणि सी. पी. अँड बेरार महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. मेधा कानेटकर या सर्वांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या विविध पैलूंवर आपल्या लेखातून प्रकाश टाकला आहे.

या पुस्तकात धोरणाची उपलब्धी काय असेल, यात अजून काय सुधारणा करण्यात यावा, याचे परिणाम व प्रभाव काय असतील, याबाबत सर्वच विद्वानांनी चर्चा केली आहे, अशी माहिती सहाय्यक संपादिका डॉ. मेधा कानेटकर यांनी याप्रसंगी दिली. हे पुस्तक राष्ट्रीय स्तरावरील एक संपादित पुस्तक असून याला आयबीएन क्रमांक दिलेला आहे. हे पुस्तक महाविद्यालयांमध्ये नि:शुल्क उपलब्ध करून देण्‍यात आले असल्‍याचे डॉ. कानेटकर यांनी सांगितले. मा. राज्यपालांनी सी पी अँड बेरार महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

फोटो कॅप्‍शन – सीपी अँड बेरार महाविद्यालय नागपूर, तर्फे प्रकाशित National Education Policy 2020 : A roadmap to transformation या पुस्तकाचे विमोचन महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम श्री. भगत सिंहजी कोश्यारी यांच्या हस्ते करण्‍यात आले. यावेळी डॉ. मेधा कानेटकर व डॉ. मिलिंद बारहाते यांची उपस्‍थ‍िती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *