- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : शहराबाहेरून येणाऱ्यांसाठी ठरणार मोठे वरदानदोसर वैश्य भवन स्टेशन मेयो रुग्णालयात येणाऱ्यांसाठी लाभदायी

महामेट्रोच्या रिच-४ अर्थात सीताबर्डी ते प्रजापतीनगर मेट्रो मार्गिकेवरील सर्वात वर्दळीचे मुख्य रेल्वे स्थानक मेट्रो स्टेशन शहराबाहेरून येणाऱ्यांसाठी ठरणार मोठे वरदान

नागपूर समाचार : महामेट्रोच्या रिच-४ अर्थात सीताबर्डी ते प्रजापतीनगर मेट्रो मार्गिकेवरील सर्वात वर्दळीचे मुख्य रेल्वे स्थानक मेट्रो स्टेशन शहराबाहेरून येणाऱ्यांसाठी मोठे वरदान ठरत आहे. जास्तीत जास्त वीस रुपयांत घरापर्यंत आता नागरिक पोहचू शकतात. दोसर वैश्य भवन मेट्रो स्टेशन मेयोत वैद्यकीय सुविधेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय लाभदायी ठरत आहे.

सीताबर्डी ते प्रजापती नगर स्टेशनपर्यंत मेट्रो मार्गिका पूर्व, मध्य व पश्चिम नागपूरला जोडते. या साडेआठ किमीच्या मार्गिकेवर कॉटन मार्केट, नागपूर रेल्वे स्टेशन, दोसर वैश्य चौक, अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलिफोन एक्सचेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक, प्रजापती नगर मेट्रो स्टेशन आहेत. नागपूर रेल्वे स्थानक हे एक मुख्य स्टेशन आहे. या नागपूर रेल्वे स्थानकच्या संत्रा मार्केट भागात मेट्रो स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर देशाच्या चारही बाजूने जाणाऱ्या रेल्वे गाड्या येतात. मोठ्या प्रमाणात नागरिक देशाच्या अन्य ठिकाणी जाण्याकरता या ठिकाणाहून प्रवास करीत असतात, त्यामुळे रेल्वे प्रवाशांना या मेट्रो स्टेशनचा मोठा फायदा होत आहे. महामेट्रोने नागपूर रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्म क्रमांक ८ येथून म्हणजेच संत्रा मार्केटच्या बाजूने मेट्रो स्टेशनला जोडले आहे.

त्यामुळे नागरिकांना सहजरित्या मेट्रो स्टेशन परिसरात पोहचता येते. प्रवाश्याना मेट्रोचा उपयोग करून पुढे घर, हॉटेल, कार्यालयात लवकर पोहोचता येते. महामेट्रोने नागपूर रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्म क्रमांक ८ येथून एस्केलेटर्सची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांना परिश्रम होत नाही. याशिवाय मेट्रो स्टेशनजवळ असलेले संत्रा मार्केट, मॉल, शाळा, रेल्वे रनिंग रूम, रेल्वे कॉलनी तसेच अनेक जुन्या वस्तीतील नागरिकांसाठीही हे मेट्रो स्टेशन उपयुक्त आहे.

स्टेशन लगतच्या परिसरात अनेक प्रतिष्ठित शासकीय व निमशासकीय कार्यालय, मंदिर, हॉल असून परिसरात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांना या स्टेशनचा लाभ होत आहे. दोसर वैश्य महासभेचे अध्यक्ष प्रकाश गुप्ता यांनी नागपूर रेल्वे स्थानक मेट्रो स्टेशनचे फायदे सांगताना संपूर्ण शहराला कनेक्टिविटी देणारे हे स्टेशन असल्याचे सांगितले. याच मार्गावर दोसर वैश्य भवन चौक मेट्रो स्टेशन आहे. या स्टेशनमुळे मेयोमध्ये वैद्यकीय सुविधेसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा लाभ मिळतो. अल्पदरात शहराच्या कुठल्याही कोपऱ्यात नागरिकांना आता मेयोत पोहोचता येते. एवढेच नव्हे या परिसरात असलेल्या बजेरिया, गितांजली टॉकीज परिसरातील नागरिकांनाही शहराच्या इतर भागात जाण्यासाठी हे स्टेशन महत्‍वपूर्ण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *