- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : आजच्या तंत्रस्नेही युगातही बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी व अनुकरणीय – जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा

समता पर्वाचा समारोप

नागपुर समाचार : आजच्या तंत्रस्नेही युगातही डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. त्यांच्या मार्गावरून चालण्याचा व आत्मनिर्भर होण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आज येथे केले.

गेल्या 26 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या समता पर्वाचे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम दीक्षाभूमी परिसर येथे समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त राहुल पांडे, जि.प. अध्यक्षा मुक्ता कोक्कडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी अधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर, प्रादेशिक उपायुक्त डॅा. सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे प्रामुख्याने उपस्थित होते.

बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. संविधान आधारित शासन कारभार सुरू आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शासनातर्फे जि.प. च्या वंचितांसाठी विविध योजना आहे. या योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत आवश्यक ते सहकार्य मिळेल, असे श्रीमती शर्मा पुढे बोलताना म्हणाल्या.

26 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या समता पर्वात प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांच्या मार्गदर्शनात विविध रचनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानापासून तर कार्यशाळेपर्यंत, योजनांच्या अंमलबजावणी पासून योजनांच्या फलश्रृतीपर्यंत या काळात आढावा घेण्यात आला. संविधानावर आधारित कार्यशाळा, रमण विज्ञान केंद्र भेट, जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची आरोग्य तपासणी, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना अंतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये श्रमदान कार्यक्रम, शासकीय निवासी शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कर्मचाऱ्यांसाठी ट्रेस मॅनेजमेंट,सफाई कामगारांच्या वस्तीमध्ये भेट, अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धामध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त राहुल पांडे, जि.प.अध्यक्षा मुक्ता कोक्कडे, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी अधिकारी सचिन कलंत्रे यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले. प्रादेशिक उपायुक्त डॅा. सिद्धार्थ गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

करियर उत्सुक विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शक डॉ वंदना गाडे यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. करिअरच्या विविध संधी याविषयीची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाला समाज कल्याण विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी,तसेच विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वसतीगृह संस्था, समाजकार्य महाविद्यालय, आश्रम शाळा येथील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी जयश्री धरवाळ यांनी केले.

रक्तदान शिबिर उत्साहात : समता पर्व कार्यक्रमाअंतर्गत महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत यात्री निवास, दीक्षाभूमी परिसर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अनुषंगाने नागपूर जिल्हयातील नागरिक तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत नागपूर जिल्हयातील सर्व कार्यालय, महामंडळ येथील अधिकारी, कर्मचारी वर्ग जिल्हयातील नागरिक, रक्तदाते मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभागी झाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *