- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ, स्वास्थ 

नवी मुंबई समाचार : नेत्रोपचारासाठी सुसज्ज रुग्णालय नवी मुंबईत

गरीब गरजू रुग्णांना होणार फायदा

नवी मुंबई समाचार : देशात मधुमेहाच्या रुग्णांप्रमाणेच नेत्रविकाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात लहान मुलांची संख्या लक्षणीय असून त्यावर उपचार करणे ही आता खर्चिक बाब झाली आहे. सर्वसामान्यांना न परवडणारा हा खर्च लक्षात घेता एएसजी या समूहाने नेत्रविकारावर स्वस्तात उपचार करणारे अत्याधुनिक रुग्णालय नवी मुंबईत सुरू केले आहे. सर्वसामान्यांना परवडणारी सर्व प्रकारची शस्त्रक्रिया या ठिकाणी केली जाणार आहे.

एएसजी या रुग्णालयाचे उद्घाटन डॉ. हरीश पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ.पाठक यांनी पत्रकारांना या समूहाबद्दल माहिती दिली. दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉ.अरुण सिंघवी व डॉ.शिल्पी गंग यांनी या समूहाची स्थापना केली. त्यानंतर काही अनुभवी व तज्ञ डॉक्टरांचा एएसजी समूहात समावेश झाल्यामुळे त्याचा विस्तार होत गेला.

देशातील १४ राज्यांमध्ये ४८ रुग्णालय या समूहाचे असून नेपाळमधील काठमांडू तर पूर्व आफ्रिका खंडातील युगांडा भागातही या समूहाचे रुग्णालय आहे. महाराष्ट्रातील नवी मुंबई, वाशी भागातील हे सहावे रुग्णालय असल्याची माहिती डॉ.पाठक यांनी दिली.

वाशी, गुडविल एक्सिलेंसी येथील रुग्णालयात मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा यासारख्या डोळ्याच्या संबंधित अनेक विकारांवर शस्त्रक्रिया व उपचार केले जाणार आहे.शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्स व त्यासंबंधी शस्त्रक्रिया या ठिकाणी आधुनिक उपचार पद्धतीने होणार आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल अशी शस्त्रक्रिया या ठिकाणी स्वस्तात केली जाणार आहे. नवी मुंबईतील या रुग्णालयात डोळ्यांशी निगडित सर्व आजार, जटिल शस्त्रक्रिया, निदान व उपचार एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.

एएसजी डोळ्यांच्या रुग्णालयात वेळोवेळी शिबिरांचे आयोजन करून गरीब व गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. दामगुडे यांनी दिली.

एएसजी समूहाला इंटरनॅशनल अचिव्हर्स तर उत्कृष्ट सेवेसाठी वेलनेस हेल्थ तसेच राजीव गांधी गोल्ड मेडल व बिझनेस वर्ल्ड इंडिया हेल्थकेअर अवॉर्ड सारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला डॉ.हरीश पाठक, डॉ.पवन लोहिया, डॉ.विनायक दामगुडे, डॉ. नितीन सैनी व डॉ. नितेश बाफना उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *