- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : समग्र गीतापठण महायज्ञात 3500 महिलांनी दिली आहुती; संस्‍कृत सखी सभा, नागपूरचे भव्‍य आयोजन 

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा परिसर मंत्रोच्‍चाराने भारावला

नागपूर समाचार : संस्कृत सखी सभा, नागपूरच्‍यावतीने गीता जयंतीनिमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या समग्र (अठरा अध्‍याय) गीता पठण महायज्ञात 3500 महिलांनी आहुती दिली तेव्‍हा ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पटांगणावर सुरू असलेल्‍या खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा परिसर पवित्र मंत्र व श्‍लोक उच्‍चाराने भारावून गेला.

अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, मुंबई, पुणे, इंदोर रायपूर, कोरबा, डोंगरगड, बल्‍लारशाह, हैद्राबाद आदी ठिकाणाहून महिला महायज्ञाला आल्‍या होत्‍या. शिवाय, हजारो महिलांची ऑनलाईन उपस्‍थ‍िती होती. 

सकाळी आठ वाजेपासून पांढ-या व क्रीम रंगाच्‍या साड्या व त्‍यावर गुलाबी रंगाचे दुपट्टे ल्‍यालेल्‍या महिलांची परिसरात गर्दी व्‍हायला लागली होती. दहा वाजता महायज्ञाचे उद्घाटन श्रीनाथपीठ, श्री देवनाथ मठ, श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जीच्‍या प. पू. रेणुका मायबाई यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी मंचावर स्‍वागताध्‍यक्ष मा. कांचनताई गडकरी, संस्‍कृ‍त सखी सभेच्‍या संस्‍थापक डॉ. विजया जोशी, संस्‍कृत भाषा प्रचारिणीच्‍या अध्‍यक्ष लिना रस्‍तोगी, डॉ. नंदा पुरी, विजया भुसारी यांच्‍यासह अनेक मान्‍यवर महिला उपस्थित होत्‍या.

कांचनताई गडकरी यांच्‍या हस्‍ते प. पू. रेणुका मायबाई तसेच, रशियन यंत्राच्‍या सहाय्याने मंत्रोच्‍चाराच्‍या ध्‍वनीलहरींच्‍या सकारात्‍मक प्रभावाचा अभ्‍यास करणारे डॉ. अविनाश कुळकर्णी व त्‍यांची कन्‍या आकांक्षा यांचा सत्‍कार करण्‍यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महायज्ञाला उपस्‍थ‍िती लावत सर्व महिलांना शुभेच्‍छा दिल्‍या. त्‍यांच्‍या हस्‍ते आरती करण्‍यात आली. 

कांचन गडकरी यांनी समग्र गीता पठण महायज्ञामुळे खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव हा अविस्‍मरणीय झाल्‍याचे सांगितले. हा महायज्ञ म्‍हणजे शक्‍ती व समर्पणाचा सोहळा असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. रेणुका मायबाई यांनी असा उपक्रम भारतभरात राबवला जावा, अशी मनिषा व्‍यक्‍त केली तर राष्‍ट्रसेविका समितीच्‍या प्रमुख संचालिका शांताक्‍का यांनी सर्व महिलांना व्हिडीओ संदेशाच्‍या माध्‍यमातून शुभेच्‍छा दिल्‍या. 

देवेश्‍वर आर्वीकर गुरूजींच्‍या मंत्रोच्‍चारात कांचनताई गडकरी यांनी संकल्‍प सोडला व शंखनादाने समग्र गीता पठण महायज्ञाला प्रारंभ झाला. 

प्रास्ताविकातून डॉ. विजया जोशी यांनी नितीन गडकरी व कांचन गडकरी यांच्यामुळे हा महायज्ञाचा गोवर्धन उचलणे शक्‍य झाले असून केवळ नागपूर नाही तर जगभरातून प्रथमच मोठ्या संख्‍येने महिला या महायज्ञात सहभागी झाल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले तर संयोजिका सोनाली अडावदकर यांनी सर्वांचे आभार मानले. 

या महायज्ञात संस्कार भारती, गीता परिवार, राष्ट्रसेविका समिती, शक्तिपीठ, गायत्री महिला,स्वयंपूर्णा उद्योजिका मंडळ, भारतीय स्त्रीशक्ती, आयुर्वेद महाविद्यालय, विश्व मांगल्य सभा, संस्कृत भारती, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, संस्कृत भाषा प्रचारिणी सभा, केशवनगर विद्यालय, पंडित बच्छाराज व्यास विद्यालय, टाटा पारशी हायस्कुल आणि शहरातील काही शाळा, नामवंत संस्थांनी तसेच, अनेक महिलांच्‍या समूहाने सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *