- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : नवमतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांचे सहकार्य अपेक्षित – मतदार यादी निरीक्षक विजयालक्ष्मी बिदरी

राजकीय पक्ष प्रतिनिधी सोबत बैठक

नागपुर समाचार : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी व मतदारांना आपले मतदान ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडणीसाठी प्रोत्साहित करावे. तसेच नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांनी केले.

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार यादी तपासणाच्या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली आज 30 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती सभागृहात मान्यताप्राप्त राजकीय पक्षाची बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड, उपजिल्हाधिकारी हेमा बढे, उपविभागीय अधिकारी शेखर घाटगे, इंदिरा चौधरी, वंदना सवरंगपते, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार राहुल सारंग व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नवमतदारांची मतदार नोंदणीची टक्केवारी 75 टक्के आहे, त्यामानाने शहरी भागातील टक्केवारी फारच कमी आहे. त्याबाबत विस्तृत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यासोबतच व्होटर हेल्पलाईनचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करण्याचे त्यांनी सांगितले. 3 व 4 रोजी होणाऱ्या शिबीरात जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करावी. यासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध क्षेत्रातील सेलीब्रिटीना या कार्यात सहभागी करुन त्यामधील व्यक्तींना ‘डिस्ट्रीक्ट आयकॉन’ बनवावे. या कामात स्वयंसेवी संघटनांना सहभागी करु नये, दुरुउपयोग होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. आधार लिंकिंगचे काम लवकरात लवकर करा. त्यामुळे प्रमाणिकरण होऊन बोगस मतदार वगळण्याच्या कामात गती येईल, असे त्यांनी सांगितले

मतदार यादी मधील मयत मतदार, कायम स्थलांतरीत मतदार, लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी, लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी, दुबार नोंद असलेल्या मतदारांची नावे कमी करणे व ज्यांचे दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्ष (जन्म दिनांक 31 डिसेंबर 2004 नंतर) पूर्ण होत आहे त्यांच्याकडून नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज घेणे याकामावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश मतदार यादी निरीक्षक विजयालक्ष्मी बिदरी यांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी दिले. 

व्होटर स्कॅनद्वारेही मतदार नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दिली.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 पर्यंत असून मतदार नोंदणीसाठी 3 व 4 डिसेंबर 2022 रोजी विशेष शिबिरीचे आयोजन करण्यात येणार आहे, 26 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येणार असून 5 जानेवारी 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

नवीन मतदारांसाठी अर्जाचा नमुना-6, मतदार यादी प्रमाणिकरण करण्यासाठी आधार क्रमांकाच्या माहितीबाबत नमुना -6 ब, प्रस्तावित समावेशाबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी /विद्यमान मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी नमुना-7 व रहिवाश्यांचे स्थलांतर/विद्यमान मतदार यादीतील नोंदीची दुरुस्ती/ कुठल्याही दुरुस्तीशिवाय मतदार ओळखपत्र बदलून देणे/दिव्यांग व्यक्ती म्हणून चिन्हांकित करण्यासाठी अर्जाचा नमुना-8 देण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *