- Breaking News, नागपुर समाचार, संत्रानगरी

नागपूर समाचार : आत्महत्या आणि कर्जमुक्त शेतकरी घडवू : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

आत्महत्या आणि कर्जमुक्त शेतकरी घडवू : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

नागपूर समाचार : कृषी क्षेत्रात समृद्धी आणण्यासाठी पुढाकार घेऊन काम करा व त्यातून सुखी, आत्महत्यामुक्त आणि कर्जमुक्त शेतकरी घडविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

मध्य भारतातील राष्ट्रीय कृषी प्रदर्शन अँग्रो व्हिजनचा सोमवारी सायंकाळी थाटात समारोप करण्यात आला. यावेळी गडकरी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, अरुणाचलचे कृषी मंत्री टागे टाकी, माजी खा. शिशुपाल पटले, डॉ. विकास महात्मे, माजी आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी, अँग्रोव्हिजन सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, संयोजक गिरीश गांधी, आयोजन सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर, माफसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, सुधीर दिवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी, मागील १३ वर्षांपासून अँग्रोव्हिजन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत आहे, यावर्षी अडीच ते ३ लाख शेतकर्‍यांनी प्रदर्शनाला भेट दिली. ३५ कार्यशाळांमधून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. येत्या काळात केवळ प्रदर्शन नव्हे तर वर्षभर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी अँग्रोव्हिजनचे कार्यालय तसेच सेंद्रीय बाजाराची स्थापना करण्यात येत आहे. या सोयींमुळे सातत्य कायम राहील आणि वर्षभर शेतकर्‍यांना मार्गदर्शन मिळत राहील. यातून कृषी लाभदायी ठरण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली.

अरुणाचलचे कृषी मंत्री टागे टाकी यांनी सांगितले की, अरुणाचल हे राज्य भौगोलिकदृष्ट्या मोठे असले तरी येथे केवळ १४ लाख लोकसंख्या आहे. परंतु कृषी विषयक मार्गदर्शनाअभावी राज्य माघारला होता. मात्र, ईशान्य भारतातील राज्यांना कृषी विषयक मार्गदर्शन करण्याचे काम नितीन गडकरी सातत्याने करतात, त्यातून आमच्या फळबागा विकसित झाल्या असल्याचे सांगितले. त्यांनी गेल्या ८ वर्षांमध्ये अरुणाचल प्रदेशात रस्ते, पुलांचे जाळे तयार केल्याने आमच्याकडे त्यांना स्पायडरमॅन म्हणूनही ओळखल्या जात असल्याचे टाकी यांनी सांगितले. हंसराज अहीर यांनी सांगितले की, अँग्रोव्हिजनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती झाल्याचे सांगत, शेतकरी जागृत आणि अभ्यासू होत असल्याचे सांगितले. प्रारंभी रवींद्र बोरटकर यांनी प्रदर्शनातील घडामोडींचा आढावा घेतला.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निबंध स्पर्धेतील विजेते सायली देशमुख, श्‍वेता डोंगलीकर आणि वृक्षम शेंडे यांना गौरान्वित करण्यात आले तर शुभम इसम, प्रियंका मेंढे आणि रेखा पांढे यांना शेतकरी अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. संचालन रेणुका देशकर यांनी केले. तर रमेश मानकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *