- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : कोराडी परिसरात धुमाकूळ घालणारी मादी बिबट अखेर जेरबंद

वीज केंद्र वसाहतीत पसरली हाेती भीती; नैसर्गिक अधिवासात सोडले

नागपूर समाचार : काेराडी वीजनिर्मिती केंद्र परिसरात गेल्या दीड महिनाभरापासून भीती निर्माण करणाऱ्या मादी बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आले. बुधवारी पहाटे ५ वाजता ताे पिंजऱ्यात अडकला. वीज केंद्राच्या परिसरात दीड महिन्यापूर्वी त्या मादी बिबट्याचे दर्शन झाले हाेते. त्यानंतर केंद्राजवळच्या वस्तीत आणि दाभा परिसरातही ती आढळून आली हाेती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी कारवाई सुरू केली. कर्मचाऱ्यांनी गस्तही घातली आणि परिसरात कॅमेरा ट्रॅप ही लावण्यात आले.

परिसरातील नागरिकांची जनजागृती करण्यात आली. मात्र बिबट्या सतत जागा बदलत असल्याने त्याचे दर्शन झाले नाही. या संपूर्ण प्रक्रियेत या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार या बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु झाली. नियमानुसार सर्व परवानगी घेत या बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी पिंजरा लावण्यात आला.

सुरुवातीच्या तीन चार दिवसात यात छोटे भक्ष ठेवण्यात आल्याने बिबट इकडे भटकला देखील नाही. परंतु नंतर जिवंत बकरी यात ठेवण्यात आल्याने भक्ष्याच्या शोधात मादी बिबट्या बुधवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान पिंजऱ्यात अडकली. यादरम्यान या बिबट्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करुन लगेचच तिच्या मुळ अधिवासात सोडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *