66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा; प्रशासनाने घेतला दीक्षाभूमीवर आढावा
नागपूर समाचार : कोरोनाच्या सावटातून बाहेर पडल्यानंतर दीक्षाभूमीवरचा 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात व वाजत-गाजत यावर्षी साजरा होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता दीक्षाभूमीवर आज आणखी एक आढावा बैठक घेत जिल्हा प्रशासनाने पाहणी केली.
यावर्षी उत्साहाने सर्व अनुयायांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दीक्षाभूमी स्मारक समितीने केले आहे. आज दीक्षाभूमी परिसरात या संदर्भातील बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. बिपिन इटनकर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, सदस्य विलास गजघाटे, पोलीस उपायुक्त बसवेश्वर तेली, अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका राम जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर व विविध विभाग प्रमुख सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी यांनी यावेळी पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था, पुस्तकांचे स्टॉल, पावसाची शक्यता लक्षात घेता तत्कालीक निवारा, बाहेर पडण्यासाठीचे मार्ग व अन्य बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते. या परिसराच्या सर्व भागाची पाहणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः सर्व उपस्थितांसोबत केली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व या ठिकाणी पुरविण्यात येणारे व तयार केलेले अन्न, खाद्यपदार्थ, याची तपासणी योग्य प्रकारे झाली पाहिजे. वितरण व्यवस्था, स्वच्छता, स्वच्छतागृहाची उपलब्धता, या संदर्भातील आदेश दिले.