- नागपुर समाचार

वृक्षारोपण हाच पेपर उद्योगाच्‍या भरभराटीचा मार्ग– विजय कौल 61वी ऑल इंडिया पेपर ट्रेडर्स कॉन्फरन्सचे थाटात उद्घाटन 

नागपूर 17 सप्टेंबर 2022

NBP NEWS 24

नागपूर:- एकेकाळी फायबर उद्योग रसातळाला जाईल असे बोलले जात होते पण आता या उद्योगाने चांगलीच झेप घेतली असून मागच्‍या काही वर्षात 8 टक्‍क्यांनी वृद्धी झाली आहे. आज पेपर उद्योगावर जरी संकट असले तरी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्‍यास भविष्‍यात या उद्योगालाही चांगले दिवस येतील आणि पेपरचे नवनवे उपयोग उदयाला येतील, असे सकारात्‍मक उद्गार सेंच्‍युरी पल्‍प आणि पेपरचे सीईओ विजय कौल यांनी व्‍यक्‍त केले. 

पेपर ट्रेडर्स असोसिएशन, नागपूर तर्फे आयोजित करण्‍यात आलेल्‍या 61व्‍या ऑल इंडिया पेपर ट्रेडर्स कॉन्फरन्स अर्थात अखिल भारतीय पेपर ट्रेडर्स परिषद, फेडरेशन ऑफ पेपर ट्रेडर्स असोसिएशनचे शनिवार रॅडिसन ब्‍यू हॉटेलमध्‍ये उद्घाटन झाले. ए.एस. मेहता, अध्यक्ष आणि संचालक, जे.के. पेपर लिमिटेड आणि वदिराज कुलकर्णी, विभागीय मुख्य कार्यकारी, आयटीसी यांची प्रमुख उपस्थित होती तर एफपीटीएचे अध्यक्ष दीपक मित्तल कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी होते. मंचावर आशिष खंडेलवाल, अध्यक्ष, पीटीए, नागपूर, हर्षित भन्साळी, सचिव, पीटीए, नागपूर, स्वागत समितीचे अध्यक्ष विजय खंडेलवाल आणि आयोजन समितीचे अध्यक्ष असीम बोर्डीया यांचीही उपस्‍थ‍िती होती. यावेळी स्‍मरणिका व टेलिफोन डायरीचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले. 

बीज भाषणातून विजय कौल यांनी नागपुरातील आठवणींना उजाळा दिल्‍या व पेपर उद्योगामुळे पर्यावरणाला धोका पोहोचू नये म्‍हणून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्‍यावर जोर दिला. 

ए. एस. मेहता म्‍हणाले, पेपर उद्योगासाठी 2013-14चा काळ अतिशय वाईट होता. देशाला मोठ्या प्रमाणात कागद आयात करावा लागला होता. वेळीच धोका ओळखून जेके पेपर्सने चाळीस हजार झाडांची लागवड केली. यावर्षी पन्‍नास हजार झाडे लावण्‍याचे ध्‍येय आम्‍ही पूर्ण केले. हा उद्योग टिकवून ठेवायचा असेल तर एकत्रितपणे प्रयत्‍न करावे लागतील. वदीराज कुलकर्णी यांनी पेपर उद्योगाच्‍या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. 

भारतातील पेपर उद्योग जितका आकर्षक आहे तितकीच त्‍याच्‍यासमोर आव्‍हाने आहेत. काळ बदलला, ग्राहकही बदलला आहे. त्‍यामुळे पेपर उद्योगानेही बदलायला पाहिजे. नवी पिढीच्‍या हाती या उद्योगाची धुरा दिली पाहिजे, असे मेहता म्‍हणाले. 

आशिष खंडेलवाल यांनी प्रास्‍ताविक केले तर विजय खंडेलवाल यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. एफपीटीएचे अध्‍यक्ष दिपक म‍ित्‍तल यांनी संघटनेच्‍या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्‍वेता शेलगावकर यांनी केले तर आभार हर्षित भंसाली यांनी मानले. 

……………

नितीन गडकरी यांच्‍या शुभेच्‍छा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ संदेशातून पेपर ट्रेडर्स असोसिएशन, नागपूरच्‍या 61व्‍या ऑल इंडिया पेपर ट्रेडर्स कॉन्फरन्सला शुभेच्‍छा दिल्‍या. असीम बोर्डीया यांची राष्‍ट्रीय अध्‍यक्षपदी नियुक्‍ती झाल्‍याबद्दल त्‍यांचे अभिनंदन केले. पेपर उद्योगातील समस्‍या सोडविण्‍याचेही यावेळी त्‍यांनी आपल्‍या या संदेशातून आश्‍वासन दिले. 

………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *