👉 नागपूर समाचार : लवकरच पावसाचे आगमन होणार आहे. राज्यात येत्या काही दिवसात मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी. शुद्धीकरण न केलेले बोअरवेल किंवा विहिरीचे पाणी तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
👉 पावसाळ्यात पिण्याचे पाणी काही कारणाने दुषित झाल्यास कॉलरा, विषमज्वर, गॅस्ट्रो, हगवण अशा आजारांचा प्रादुर्भाव होतो. तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थावर माश्या बसून ते दुषित झाल्यास उलट्या, जुलाब, कावीळ असे आजार होतात. याबाबत काही लक्षणे आढळल्यास त्वरीत मनपाच्या किंवा शासकीय दवाखान्यात डॉक्टरांचा सल्ला घेउन उपचार सुरू करावेत, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे. पावसाळ्यात उद्भवणारे आजार टाळण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे सूचना दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी या दिशानिर्देशांचे पालन करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
काय करावे
- मनपाच्या नळाद्वारे पुरवठा होणा-या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा
- पिण्याचे पाणी उकळून थंड झाल्यावर शक्य असल्यास त्यात क्लोरिन गोळ्यांचा वापर करून पिण्यास वापरावे
- अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत
- उलट्या, जुलाब, कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर झाल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेउन उपचार सुरू करावेत. मनपा व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय उपलब्ध आहे
- ताप, मळमळ, चक्कर, उलटी, हगवण आदी गॅस्ट्रोची लक्षणे आढळल्यास रुग्णाला त्वरीत ओ.आर.एस. पाजावे व त्वरीत डॉक्टरांकडे जाउन उपचार घ्यावे
- मनपाच्या आयसोलेशन रुग्णालयामध्ये गॅस्ट्रोवर मोफत उपचाराची सोय उपलब्ध आहे
- सर्व खाजगी वैद्यकीय रुग्णालयांमध्ये उपचारास आलेल्या अशा रुग्णांची माहिती रुग्णालय प्रशासनाने मनपाला द्यावी
- प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे
- नागरिकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वछ ठेवावा
काय करू नये
- शुद्धीकरण न केलेल्या बोअरवेल, विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरू नये
- शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्नपदार्थ खाउ नये
- हातगाड्यांवर उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाउ नये
- ताप, मळमळ, चक्कर, उलटी, हगवण आदी गॅस्ट्रोची लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.