- Breaking News

नागपुर समाचार : उप्पलवाडी औद्योगिक वसाहतीच्या जमिनीची लीज वाढवणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

जिल्हाधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक 

नागपूर समाचार (वासुदेव पोटभरे) : विदर्भातील पहिली औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या उप्पलवाडी औद्योगिक वसाहतीच्या जमिनीची लीज वाढवून मिळण्याबाबतचा प्रस्ताव राज्यशासनाकडे दाखल करण्यात आला असून यासंदर्भांत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. लीजचे नूतनीकरण झाल्यांनतर रस्ते, वीज, पाणी या समस्याही मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी नागपूर इंडस्ट्रिअल इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

उप्पलवाडी औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयाला पालकमंत्र्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सत्कारानंतर ते बोलत होते. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष अरविंद चौधरी, माजी संचालक आर. एच. मेहता, माजी उपाध्यक्ष आर. सी. अग्रवाल, संचालक राजेश ठक्कर, राजेश सराफ, राकेश खंडेलवाल, नगरसेवक परसराम मानवटकर, राजा करवाडे, राजेश लाडे, रवी कोट्याल सुखबीरसिंग आदी उपस्थित होते. डॉ. नितीन राऊत म्हणाले, उप्पलवाडी औद्योगिक वसाहत ही विदर्भातील पहिली औद्योगिक वसाहत आहे.

मोरारजी देसाई देशाचे वित्तमंत्री असताना १९६१ मध्ये या वसाहतीची स्थापना झाली. मात्र, या वसाहतीकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याने पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही. माझ्या मतदारसंघात हा परिसर असल्याने काही प्रश्नांची सोडवणूक मी केली. आता जमिनीच्या लीजचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविला आहे. लीजची मुदत वाढल्यानंतर औद्योगिक क्षेत्राला लागणारी २४ तास वीज, उत्तम रस्ते, ड्रेनेज व सिवर लाईन या सर्व सुविधा उपलब्ध होतील. सोसायटीने १५ टक्के रक्कम भरल्यास ही जमीन ‘फ्री होल्ड” करता येईल. सोलर रूफ टॉप लावल्यास दिवसा सौर ऊर्जा आणि रात्रीच्या वेळी औष्णिक ऊर्जा मिळू शकेल.

वीज प्रकल्पातील ‘फ्लाय ऍश”चा वापर सिमेंट रस्ते, पूल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याने याठिकाणी सिमेंट उद्योग वाढवता येईल. या औद्योगिक वसाहतीमध्ये आधुनिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी चांगली योजना सादर करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. उप्पलवाडी वसाहतीमध्ये रस्ते, ड्रेनेज लाईनची समस्या गंभीर असल्याची माहिती अरविंद चौधरी यांनी दिली. पश्चिम नागपूर औद्योगिक सोसायटी आणि ग्रामीण भागातील समस्या कृपालसिंग संधू, सरदार गोपालसिंग यांनी पालकमंत्र्यांपुढे मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *