- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : भविष्यातील सजगतेसाठी द कश्मीर फाईल पहा – पुनीत इस्सर

भविष्यातील सजगतेसाठी द कश्मीर फाईल पहा – पुनीत इस्सर

नागपूर समाचार, २४ मार्च : देश स्वतंत्र असुनही कश्मीरात हा नरसंहार घडला. मात्र, भूतकाळातील हे सत्य लपविल्या गेले. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. चित्रपटाच्या माध्यमातून ते सर्वांसमोर आलाय. म्हणून भूतकाळासाठी नव्हे, भविष्यातील सजगतेसाठी द कश्मीर फाईल पहा, कारण, हा चित्रपट नसून एक चळवळ आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते पुनीत इस्सार यांनी केले.

श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे माजी महापौर संदीप जोशी यांच्यावतीने नागपूर शहरातील २५00च्या वर प्रेक्षकांना नि:शुल्क द कश्मीर फाईल चित्रपट दाखविण्यात येत आहे. या अनुषंगाने चित्रपटातील कलावंत सुप्रसिद्ध अभिनेते पुनीत इस्सार यांनी नागपूर शहरात ट्रस्टद्वारे सुरू असलेल्या शोला भेट दिली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेत त्यांच्यासमवेत श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी, गजानन निशितकर, यश सातपुते, पराग सराफ, योगेश जोशी, आदित्य ठाकूर, सुमेध कुळकर्णी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, काश्मीरमध्ये १९८९-९0 साली झालेला अमानुष नरसंहार हा स्वतंत्र भारतातील मोठा नरसंहार आहे. काश्मीरवर अनेक चित्रपट बनलेले आहेत. मात्र, त्यात या नरसंहाराचा साधा उल्लेखही नाही, ही शोकांतिका आहे. हृदयाला स्पर्श करणारे चित्रपट काही मोजकेच आहेत. त्यात द कश्मीर फाईल चित्रपट लोकांच्या हृदयाला स्पर्श करतो व लोक ती भावना व्यक्त करतात तेव्हा समाधान वाटते, असेही ते म्हणाले. द काश्मीर फाईल हा केवळ चित्रपट राहिलेला नसून ती एक चळवळ झालेली आहे. या चळवळीमध्ये नागपुरातून संदीप जोशी यांनी महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे. पुस्तकांमधून कधीही पुढे न आलेला ज्वलंत इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केलेली लोकचळवळ या कार्यात प्रोत्साहन देणारी आहे, अशा शब्दांत त्यांनी माजी महापौर संदीप जोशी यांच्या कार्याचे कौतुक केले. या चित्रपटाला मिळत असलेले यश पुढे अशा अनेक सत्यकथा पुढे आणण्यास इच्छूक असणार्यांसाठी मोठे प्रोत्साहन ठरणार आहे, असा आशावादही पुनीत इस्सार यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.