- नागपुर समाचार, सामाजिक 

शंकर महादेवनच्या गण्यांनी झाली खासदार सांस्कृतिक महोत्सव ची भव्य सुरुआत

शंकर महादेवनच्या गण्यांनी झाली खासदार सांस्कृतिक महोत्सव ची सुरुआत

March 19, 2022

NBP NEWS 24

शंकर महादेवनने नागपूरकरांसोबत साजरा केला संगीत कारकीर्दीचा रौप्‍य महोत्‍सव

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा भव्य उद्घाटन

नागपूर, १९ मार्च २०२२: शंकर-एहसान-लॉय या संगीतकार त्रिकूटाने अनेक सुमधूर गीतांची भेट संगीत रसिकांना दिली. त्‍यांच्‍या संगीत कारकीर्दीचा रौप्‍य महोत्‍सव सुप्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन यांनी शनिवारी नागपूरकरांसोबत साजरा केला. या त्रिकूटाने संगीतबद्ध केलेले गीत ‘दिल चाहता है… कभी ना बीतें चमकीले दिन’ या गीतासह भजन, गणेशवंदना, शास्‍त्रीय, रॉकींग अशी विविध प्रकारची गीते शंकर महादेवन यांनी सादर केली आणि नागपूरकर संगीत रसिकांनी अक्षरश: त्याला डोक्यावर घेतले.

साहित्‍य, संस्‍कृती, संगीत, नाट्य, नृत्‍य अशा अनेक कलांचा संगम असलेल्‍या खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवाच्‍या उत्‍तरार्धाचे शनिवारी ईश्वर देशमुख कॉलेजच्या मैदानात खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच इतर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलनाने उद् घाटन झाले. यावेळी मंचावर माजी मुख्‍यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्‍यासह खासदार कृपाल तुमाने, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आ.समीर कुणावार, माजी आ.सुधाकर देशमुख, आ.परिणय फुके, आ.विकास कुंभारे, आ.नागो गाणार, आ.मोहन मते, माजी मंत्री प्रवीण खोटे पाटील, डॉ. मिलिंद माने, आ.प्रवीण दटके, खा.विकास महात्‍मे,अॅड. सुलेखा कुंभारे, डॉ. मदन कापरे, डॉ. विभा दत्‍ता, सुरेश शर्मा आदी यांची उपस्थिती होती. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्‍यासह नागपूरची युवा गायिका श्रीनिधी घटाटे हिचा सत्कार नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. श्रीनिधीचे शंकर महादेवन यांनी भरभरून कौतूक केले.‘वक्रतुंड महाकाय’, गणणायकाय गणदैवताय… या गणेशवंदनांनी शंकर महादेवन यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.

 

‘नितीन गडकरी यांच्‍यासारखा नेता देशाला लाभला असून देश विकासाच्‍या वाटेवर चालत आहे. आजचा हा कार्यक्रम दोन वर्षापूर्वी स्‍वप्‍नवत होता. पण हे स्‍वप्‍न आज प्रत्‍यक्षात उतरले असून नागपूरच्‍या रसिकांच्‍या प्रतिसादाने खूष आहे’, असे शंकर महादेवन म्‍हणाले. ‘लक्ष्‍य’ हे गीत त्‍यांनी डॉक्‍टर, सैनिक आणि फ्रंटलाईन वर्करला समर्पित केले तर ‘प्र‍िटी वुमन’ हे गीत वुमन पॉवर ला समर्पित केले. घेई छंद, बगळ्याची माळ अशा मराठी गीतांसह तेरे नैना, रॉक ऑन, सजदा, दिलबरो, बोलना हलके हलके आणि काही अनप्‍लग गाणी जसे आओना, जाने क्‍यूं, सलामे इश्‍क, सॅनोरिटा, कजरारे, कल हो ना हो अशी विविध प्रकारची गीते सादर करून नागपूरकरांना मंत्रमुग्‍ध केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी यांनी केले तर प्रास्‍ताविक जयप्रकाश गुप्‍ता यांनी केले. प्रा. राजेश बागडी यांनी आभार मानले.

 

कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्‍य बाळ कुळकर्णी, अविनाश घुशे, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील यांनी सहकार्य केले.

नागपूरकरांसाठी ‘खास’ उत्‍तरार्ध-

नितीन गडकरी म्‍हणाले, कोविडमुळे मागच्‍या वर्षीचा महोत्‍सव मध्येच स्‍थगित करावा लागला. नागपूरकरांच्‍या आग्रहास्‍तव या महोत्‍सवाचा उत्‍तरार्ध घेऊन येत आहोत. त्‍याची सुरुवात आज सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्‍या गायनाने होते आहे. उर्वरित पाच दिवस विविध कार्यक्रमाची पर्वणी आहे, त्‍याचा आनंद नागपूरकरांनी घ्‍यावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

गडकरींनी बदलली विकासाची परिभाषा – देवेंद्र फडणवीस
नितीन गडकरी यांच्‍या माध्‍यमातून कलावंताना एक नवे व्‍यासपीठ उपलब्‍ध झाले असून यात आतापर्यंत स्‍थानिकांसह राष्‍ट्रीय- आंतराष्‍ट्रीय दर्जाच्‍या कलावंतांनी आपली कला सादर केली. नितीन गडकरी यांनी विकासाची परिभाषाच बदलली असून पायाभूत सुविधा म्‍हणजेच केवळ विकास नव्‍हे तर नागरिकांचा सांस्‍कृतिक, शारिरिक, बौद्धीक विकासदेखील झाला पाहिजे, या संकल्‍पनेतून त्‍यांनी हा महोत्‍सव त्‍यांनी सुरू केला, असे देवेंद्र फडणवीस म्‍हणाले.

स्वरांची रानी स्व.लता मंगेशकर यांना दिली आदरांजली-

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा उत्‍तरार्थ गानकोकिळा लता मंगेशकर यांच्‍या स्‍मृतिंना समर्पित करण्‍यात आला. त्‍यांच्‍यावर तयार करण्‍यात आलेली ध्‍वनचित्रफित यावेळी सादर करण्‍यात आली. दोन मिनिटे मौन पाळून त्‍यांना श्रद्धांजली अर्पण करण्‍यात आली.

आज महोत्‍सवात-

‘इंडिपॉप क्‍वीन’ सुनिधी चौहान हिचा ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *