- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपूरकरांचे नाव जागतिक स्तरावर नेणारा अभिनव प्रकल्प : ना. नितीन गडकरी

ऑरेंज सिटी मॉल बांधकामाचे भूमिपूजन

नागपूर समाचार : ऑरेंज सिटी स्ट्रीट अंतर्गत ऑरेंज सिटी मॉल प्रकल्प नागपूर शहरातील जनतेचे नाव जागतिक स्तरावर उंचावणारा प्रकल्प ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्पांतर्गत भूखंड क्रमांक १ वरील ऑरेंज सिटी मॉलचे प्लिंथ लेव्हलवरील उर्वरित बांधकाम नागपूर महानगरपालिकेद्वारे खासगी उद्योजकांमार्फत भागीदार तत्वावर विकसीत करण्यात येत आहे. या कामाचे शुक्रवारी (ता.२५) भुखंड क्रमांक १, जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन जवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते.

मंचावर महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी शामकुळे, ज्येष्ठ नगरसेवक नासुप्रचे विश्वस्त संजय बंगाले, माजी महापौर नंदा जिचकार, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, विधी समिती सभापती मिनाक्षी तेलगोटे, नगरसेवक लहुकुमार बेहते, नगरसेवक किशोर वानखेडे, नगरसेविका तारा (लक्ष्मी) यादव, नगरसेवक लखन येरवार, नागेश मानकर, नगरसेविका वनिता दांडेकर, नगरसेवक विजय चुटेले, मुख्य अभियंता प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, प्रकल्पाचे बांधकाम कार्य पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी असलेले प्रफुल वेद इन्फ्रा. प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल देशमुख, अमीर वली आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, आज जागतिक दर्जाचे सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे नागपुरात सुरू आहेत. मेट्रोसह अनेक पथदर्शी प्रकल्प आज देशाचेच नव्हे तर जगाचेही लक्ष आपल्या शहराकडे वेधून घेत आहेत. याच शृंखलेत आता ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहे. वाणिज्य, निवासी, व्यावसायिक, दवाखाने आदी सर्व व्यवस्थांनी युक्त प्रकल्प नागपूर शहरात साकारले जाणार आहे. सदर प्रकल्प मेट्रो स्टेशनला जोडून असल्याने नागरिकांना, येथे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना, कर्मचाऱ्यांना मोठी सुविधा होणार आहे. सदर जागेवरील रेल्वे लाईन काढल्या गेल्यानंतर अवघ्या अडीच कोटी रुपयांमध्ये ही जागा खरेदीकरण्यात आली. या जागेवर २१ प्रकल्प साकारले जाणार असून याचा पहिला टप्पा ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. नागपूर शहरासाठी महत्वकांक्षी प्रकल्प ठरणार आहे, असा आशावादही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. 

शहराची सर्वांगीण विकासाकडे वाटचाल : महापौर दयाशंकर तिवारी….

नागपूर शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीतील अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात मनपाने महत्वाची भूमिका निभावली आहे. भौतिक विकासासह आरोग्य आणि शैक्षणिक विकासकडेही मनपाने विशेष लक्ष दिले. शहरातील आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या अंतर्गत भागात वंदे मातरम जनस्वास्थ्य केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मनपाच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेऊन संरक्षण, वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात नावलौकिक मिळवावे यासाठी ‘सुपर-75’ उपक्रम राबविण्यात येत आहे. गरीब घरच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी ६ इंग्रजी माध्यम शाळा सुरू करण्यात आल्या. एकूणच शहराची रस्ते, पाणी, वीज या भौतिक विकासासह सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. 

ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाचे नाव लंडन स्ट्रीट असे प्रस्तावित असताना तत्कालीन स्थायी समिती सभापती या नात्याने शहराची ओळख असलेल्या ऑरेंज सिटी स्ट्रीट असे प्रकल्पाचे नाव असावे अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विनंती केली असता त्यांनी प्रकल्पाला हे नाव दिल्याची आठवणही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितली. 

प्रस्ताविकात कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती विषद केली. कार्यक्रमाचे संचालन स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी केले. आभार लक्ष्मी नगर झोन सभापती पल्लवी शामकुळे यांनी मानले.

प्रकल्पाचे उत्कृष्ट डिझाइन तयार करणाऱ्या आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर समूह आणि प्रकल्पाचे बांधकाम कार्य पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी असलेले प्रफुल वेद इन्फ्रा. प्रा. लि.च्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सत्कार केला. 

प्रकल्पाची माहिती…..

  • नागपूर येथे वर्धा रोड, हॉटेल रेडिसन ब्ल्यू सी.आर.पी.एफ. या भागात मौजा सोमलवाडा, खामला, भामटी, टाकली व जयताळा या परिसरातील मनपाच्या मालकीची ३०.४९ हेक्टर जागेवर मनपाद्वारे स्वबळावर ऑरेंज सिटी प्रकल्प
  • म.न.पा.च्या मालकीच्या मौजा सोमलवाडा, खामला, जयताळा येथील ३०.४९ हेक्टर जागेवर ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्प मनपा स्वबळावर साकारत आहे.
  • या संपूर्ण प्रकल्पाकरिता आर्की. हाफीज काँट्रक्टर यांची प्रकल्पिय व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली असून प्रकल्पाचा आराखडा त्यांनी तयार केला आहे
  • सदर प्रकल्पाची २१ भूखंडामध्ये विभागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकल्पात वाणिज्यिक, व निवासी, व्यावसायिक व निवासी, निवासी व दवाखाने, कन्व्हेन्शनल सेंटर, बाजार, निवासी गाळे, आर्थिक दुर्बल घटकाकरिता निवासी गाळे आदींचा समावेश आहे.
  • ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाने टप्प्याटप्प्याने प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे
  • या प्रकल्पाला सुमारे कालावधी १० वर्षे गृहित असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण जागेचा विकास प्रस्तावित आहे. त्यामुळे मनपाला भरीव उत्पन्न प्राप्त होउ शकेल
  • प्रकल्पाच्या जागेतील २१ भूखंड पाडण्यात आले आहेत.

प्रस्तावित प्रकल्पाची माहिती.….

  • ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाची २१ भूखंडात विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात प्लॉट क्र. १ वर जयप्रकाशनगर मेट्रो स्थानकाजवळ ऑरेंज सिटी मॉल उभारण्यात येणार आहे
  • प्लॉट क्र. ५ मौजा भामटी क्षेत्रफळ ७५३३.५९ चौरस मीटर या प्लॉटवर व्यावसायिक संकुल प्रस्तावित असून याबाबत आराखडे तयार करून डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट अँड सेल या तत्वावर कामाचे नियोजन करण्यात येत आहे व लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.
  • मेडिकल हब प्लॉट क्र. १० व ११ वर उभारण्याची तयारी नियोजित आहे. कोट्यवधीचे प्रकल्प मनपा डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट अँड सेल या तत्वावर राबविणार आहे व नियोजन प्रक्रियेत आहे.
  • प्लॉट क्र. ४ मौजा भामटी क्षेत्रफळ ४२९४.०० चौ.मी. प्लॉटवर व्यावसायिक संकुल प्रस्तावित असून याबाबत आराखडे तयार करून कामाचे नियोजन करण्यात येत आहे.

ऑरेंज सिटी मॉल प्रकल्पाची माहिती…..

  • पहिल्या टप्प्यात जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन लगत भुखंड क्र. १ वर (३३०८.००चौ.मी. क्षेत्रफळ)
  • मेट्रो रेल्वेसोबत सामंजस्य करार करून ऑरेंज सिटी मॉलच्या बांधकामास सुरूवात झालेली असून प्लिंथ लेव्हल पर्यंतचे काम त्यांच्यामार्फत झालेले आहे. त्याकरिता त्यांना ११ कोटी रुपये अग्रीम राशी देण्यात आली आहे.
  • ऑरेंज सिटी मॉलच्या संपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाची अंदाजीत किंमत ५५.३६ कोटी आहे.

प्रकल्पाचे वैशिष्ट्य…..

  • भूखंड क्रमांक १
  • भूखंडाचे क्षेत्रफळ ३३०८ चौ.मी.
  • प्रस्तावित बिल्डअप एरिया १०६२९.६३
  • प्रस्तावित एफएसआय-३.२१३
  • इमारतीची प्रस्तावित उंची ४५ मीटर, तळमजला + १० मजले + २ तळमजले
  • एकूण १० माळे
  • माळ्याचे क्षेत्रफळ १७६७.४९
  • रुफटॉप रेस्टॉरेंट
  • चवथ्या माळ्यावर मेट्रो स्टेशनला मॉलला पूर्णपणे जोडण्यात येईल
  • पिक अप अँड ड्रॉप अप पॉईंट
  • वाहनतळ ३०९ सायकल्स, २९७ दुचाकी, १५६ चारचाकी वाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *