नागपूर समाचार : भाजपचे नेते परिणय फुके यांनी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांशी संबंधित जाहिरातीच्या वादावरून विरोधकांवर कडाडून टीका केली. विरोधक कोणतीही वस्तुस्थिती तपासून न पाहता जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांबाबत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात ही नवीन नसून १९८४ च्या शासन निर्णयानुसार दरवर्षी अशी प्रक्रिया राबविली जाते, असे फुके यांनी स्पष्ट केले. मात्र, काही नेते अपूर्ण माहितीच्या आधारे राजकारण करत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “कोणत्याही विषयावर बोलण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. केवळ प्रसिद्धीसाठी आणि राजकीय टीकेसाठी मुद्दे उचलले जात आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
शेतकरी कर्जमाफी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या भूमिकेवरही फुके यांनी भाष्य केले. विरोधक सातत्याने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असून सरकारच्या निर्णयांबाबत चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याचे काम भाजप करत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“तथ्यांपेक्षा राजकारणाला प्राधान्य; विरोधकांमुळे जनतेत संभ्रम”, असा घणाघाती आरोप करत फुके यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.




