- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण व असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन

नागपूर समाचार : अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, नियोजन विभाग यांच्याद्वारे नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) व असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्घाटन आज वसंतराव नाईक राज्य कृषी प्रशिक्षण संस्था, नागपूर (वनामती) येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे हस्ते संपन्न झाला. या उद्घाटन समारंभास श्रीनिवास उप्पला, उपमहानिदेशक राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, पश्चिम क्षेत्र, कृष्णा फिरके, विशेष आयुक्त, अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, दिनेश वाघ, अतिरिक्त आयुक्त, अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, डॉ. सुशील हे. आग्रेकर, सह आयुक्त, प्रादेशिक कार्यालय, नागपूर, संध्या मि. गवई सह आयुक्त, प्रादेशिक कार्यालय, अमरावती, अशोक कुमार टोपराणी, सेवानिवृत्त अपर महानिदेशक, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सुनिल वैरागडे, सहायक संचालक, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, क्षेत्रिय कार्यालय, नागपूर व IPSOS संस्थेचे तृप्ती शर्मा, संचालक उपस्थित होते. 

यावेळी डॉ. कमलकिशोर फुटाणे यांनी नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण व असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण ही महत्वाची सर्वेक्षणे असून या सर्वेक्षणामधुन प्राप्त होणारी आकडेवारी ग्रामपातळीवर, जिल्हा आणि विभागस्तरावरील कल्याणकारी योजना व धोरण निर्मितीसाठी खुप उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सर्व प्रगणकांनी आकडेवारी गोळा करतांना दक्षता घ्यावी तसेच सर्व नागरिकांनी स्वेच्छेने अचूक माहिती प्रगणकांना द्यावी, असे आवाहन केले.

विकसित भारत @ २०४७ चे ध्येय पूर्ण करण्यासाठी अचूक व अद्यावत माहिती अत्याश्‍यक आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणापूरती मर्यादित नसून नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) व असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) सर्वेक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक मजबूत पाया घालणारी महत्वपूर्ण प्रक्रीया आहे, असे श्री. श्रीनिवास उप्पला उपमहानिदेशक राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, पश्चिम क्षेत्र, नागपूर यांनी सांगितले.

विकसित भारत @ २०४७ नुसार जिल्हा हे विकासाचे मध्यवर्ती केंद्र आहे. त्याकरिता जिल्हास्तरीय रोजगार – बेरोजगार आकडेवारी, असंघटीत क्षेत्रातील उद्योगांची संख्या तसेच रोजगार निर्मिती इत्यादी निर्देशकांची सविस्तर सांख्यिकीय माहिती आवश्यक आहे. श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) व असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) या दोन्ही सर्वेक्षणाद्वारे निर्माण होणारी सांख्यिकीय माहिती वेगवेगळ्या निर्देशकांद्वारे राज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्यास मददगार होईल. शासनाच्या विविध योजना आखण्यात, वेगवेगळ्या क्षेत्रातील धोरणे निश्चित करण्यात या दोन्ही सर्वेक्षणांचे अनन्य साधारण महत्त्व आहे, असे श्री. कृष्णा फिरके, विशेष आयुक्त, अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, मुंबई यांनी विशद केले.

या पाच दिवसीय प्रशिक्षणास IPSOS Research Pvt. Ltd. या बाहयसंस्थेकडून नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना PLFS सर्वेक्षणांतर्गत रोजगार-बेरोजगारीची स्थिती, कामगार सहभाग दर, उद्योग व व्यवसायनिहाय रोजगाराची रचना याबाबत तसेच ASUSE सर्वेक्षणांतर्गत असंघटित क्षेत्रातील उद्योगांची संख्या, स्वरुप, आर्थिक स्थिती, रोजगारनिर्मिती व उत्पन्न-खर्च यासंबंधी माहिती संकलनाच्या संकल्पना, व्याख्या व CAPI तंत्रज्ञानाद्वारे Tablet वर माहिती नोंदणीचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यामध्ये PLFS आणि ASUSE सर्वेक्षणांतर्गत एकूण 6828 इतक्या नमुना घटक असून 276 अन्वेषक व निरीक्षक यांच्याद्वारे काम पूर्ण करण्यात येणार आहे. नागपूर व अमरावती विभागात PLFS व ASUSE या दोन्ही सर्वेक्षणांसाठी शहरी आणि ग्रामीण भाग मिळून एकूण 1774 नमुना घटकांचे सर्वेक्षण होणार आहे व हे सर्वेक्षण 55 अन्वेषक आणि 21 निरीक्षक यांच्या टीमद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशा पाटील, सह आयुक्त (गणना व पाहणी), अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, मुंबई यांनी केले तर आभार प्रदर्शन तृप्ती शर्मा यांनी केले.