- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : शेतातील पाणी शेतात मुरविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

नागपूर समाचार : अल-निनोमुळे यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अल-निनोसमवेत युध्दामुळे रासायनीक खते व निविष्ठांबाबत आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी नैसर्गिक, सेंद्रीय खते व निविष्ठांवर अधिक भर देऊन शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर पडणाऱ्या प्रत्येक थेंबाला शेतातच अडविण्यासाठी बांध बंदिस्ती आणि सरीवरंबा पध्दतीने शेत करण्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. 

किन्ही येथे आत्मामार्फत प्रोत्साहन देऊन साकारलेल्या दीपस्तंभ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला भेट देऊन शेतकऱ्याशी त्यांनी संवाद साधला. या केंद्रामार्फत 25 शेतकऱ्यांचे गट संलग्न असून सुमारे 500 हेक्टर शेती ही नैसर्गिक आणि सेंद्रीय पध्दतीने करण्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. यासाठी लागणारे गांडूळ खत, ट्रायकोडर्मा, दशपर्णी, जीवांमृत आदी विविध प्रकारच्या सेंद्रीय खतांचे उत्पादन या केंद्रात केले जाते. 

कुही तालुक्यातील बारवा गावात त्यांनी सरीवरंबा पध्दतीने लागवड करण्यासाठी बेडमेकर यंत्राची पाहणी केली. एका दिवसात या यंत्राद्वारे सुमारे 3.5 एकर शेतीमध्ये बेडनिर्मिती केली जाते. यात तांत्रीकदृष्टया अधिक सुलभता येऊ शकेल यादृष्टीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

भविष्यात पाण्याचे संकट टाळण्यासाठी व्यापक प्रमाणात आपल्याला पाण्याच्या बचतीसाठी प्रयत्न करावे लागणार आहे. सरीवरंबा पध्दतीतून शेतातले पाणी शेतात मुरण्यास मदत होते. पाण्याचा पडलेला ताण या पध्दतीतून पिकांना कमी प्रमाणात होतो असे त्यांनी सांगितले. या भेटीत त्यांनी गावातील पाणंद रस्ते, जलजीवन आदी कामांचा आढावा घेतला.