- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागरिकांच्या प्राप्त तक्रारी प्राधान्याने सोडवा; महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर समाचार : नागरिकांकडून नागपूर महानगरपालिकेकडे विविध मध्यातून नोंदविण्यात येणाऱ्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 08) बैठकीत दिले. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा तक्रार निवारण प्रणालीची आढावा डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह येथे घेण्यात आला.

याप्रसंगी नगरसेविका श्रीमती सुषमा चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, प्र.अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, श्री. निर्भय जैन, डॉ. रंजना लाडे, श्री. मंगेश खवले, श्री. राजेश भगत, डॉ. मेघना वासनकर, श्री. गणेश राठोड, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मनपाचे सहायक आयुक्त सर्वश्री श्याम कापसे, राजकुमार मेश्राम, धनंजय जाधव, विकास रायबोले, हरिष राऊत, प्रमोद वानखेडे, संजय कांबळे, नगर रचना उपसंचालक श्री. गिरीश गोडबोले, उपसंचालक ऋतुराज जाधव, शिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी काटकर, विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्री.स्वप्नील लोखंडे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याकरिता नागपूर महानगरपालिकेने ऑनलाईन पोर्टल सुविधा, ‘माय नागपूर’ ॲप, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 155304 आणि ‘महापौर ग्रिव्हन्स ॲप’ सुरू केले आहे. त्याअनुषंगाने मनपा तक्रार निवारण प्रणालीची आढावा बैठकित घेण्यात आला.

यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी महापौर ग्रिव्हन्स ॲप व इतर माध्यमातून प्राप्त तक्रारी सोडविण्याचे निर्देश दिले. त्यांनी तक्रारीची दखल संबंधित अधिकारी आणि विभाग प्रमुखांनी तत्काळ घ्यावी, तक्रारी सोडवून मनपाची प्रतिमा चांगली करावी, तक्रारीचे निराकरण करण्याला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावे, तक्रारी निवारणावर नागरिकांचे समाधान व्हावे असे कार्य करावे, वेळेच्या आत तक्रारी सोडविण्यात याव्या, असे निर्देश ही त्यांनी बैठकीत दिले. याशिवाय तक्रारी सोडविल्यानंतर नागरिकांकडून फिडबॅक घेण्याच्या सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

बैठकीत प्र.अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम यांनी मनपाच्या तक्रार निवारण प्रणालीची सविस्तर माहिती दिली. त्यांनी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण कसे केले जाते याची संपूर्ण माहिती दिली.