नागपूरला एक शक्तिशाली ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करणार; महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस उत्साहात
नागपूर समाचार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राला जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात प्रगतीचे टप्पे गाठता आले. सामाजिक समता, संविधानाच्या मूल्यांचे रक्षण आणि लोकाभिमुक प्रशासनासाठी आपण अनेक महत्त्वपूर्ण नवनवीन योजना साकारल्या. विकासाच्या या प्रक्रियेत कोणताही व्यक्ती शासनाच्या योजनापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही कटिबद्ध असून जनतेचा सक्रिय सहभाग वाढवून पारदर्शक, जबाबदार व गतिमान प्रशासनाची अनुभूती सर्व घटकांना देऊ, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात आयोजित मुख्य शासकीय राष्ट्र ध्वजवंदन समारंभात ते बोलत होते. यावेळी महापौर नीता ठाकरे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ . विपीन इटनकर, नासुप्र सभापती संजय मीना, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री बोलताना पुढे म्हणाले की, नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली नागपूरसह विदर्भाच्या विकासाला आवश्यक असणारे अनेक प्रकल्प मिळाले. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पातून विकासासाठी व्यापक निधी दिला आहे. रामटेकच्या पर्यटन वैभवाला नवी झळाळी आणि स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी नवरगाव, रामटेक येथे राज्यातील भव्य चित्रनगरी विकसित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. रामटेक विकास आराखडा टप्पा 2 साठी यंदा विशेष निधीची तरतूद करण्यात आली असून नागपूरला एक शक्तिशाली ‘ग्रोथ हब’ म्हणून आपण विकसित करीत आहोत. ‘नवीन नागपूर व्यापार व वित्तीय केंद्र’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या माध्यमातून विकासाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प करून नवीन प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन आणि गतिमानता हे महाराष्ट्राच्या विकासाचे स्तंभ निश्चित केले आहेत. विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी, शाश्वत शेती, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, नदीजोड प्रकल्प, हरित तंत्रज्ञान, शहर विकास आणि स्टार्टअपला चालना दिली असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करून 16 हजार मेगावॅट डिस्ट्रीब्युटेड पॉवर सप्लाय योजना राबविली. देशातील एकूण सोलर वॉटर पंपांपैकी 60 टक्के पंप एकट्या महाराष्ट्रात बसवण्यात आले. 2030 पर्यंत राज्यातील 52 टक्के वीज उत्पादन रिन्यूएबल एनर्जीमधून होणार असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले. कार्यक्रमात विविध पदके प्राप्त तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




