नागपूर समाचार : राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या एसटी प्रवासातील ५० टक्के सवलत योजनेत आता ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य केल्याने महिला प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आधार कार्ड दाखवून मिळणारी ही सवलत बंद करून १९९ रुपये शुल्क आकारून स्मार्ट कार्ड सक्तीचे करणे, म्हणजे महिलांवर आर्थिक भुदंड लादण्यासारखे आहे, असा आरोप भाजप आध्यात्मिक आघाडीचे नागपूर शहर कोषाध्यक्ष विजय येरणे यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही अट तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
राज्य परिवहन महामंडळाने (ST) ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत दिली आहे. सुरुवातीला केवळ आधार कार्ड किंवा ओळखपत्र दाखवून ही सवलत सहज उपलब्ध होत होती. मात्र, आता महामंडळाने यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य केले आहे. हे कार्ड काढण्यासाठी महिलांना १९९ रुपये मोजावे लागत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील सामान्य महिलांसाठी ही रक्कम मोठी असून, कार्ड काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांचा वेळही वाया जात आहे.
मुख्य मागण्या
- आधार कार्ड ग्राह्य धरा : केवळ आधार कार्ड किंवा अधिकृत ओळखपत्र दाखवून महिलांना पूर्वीप्रमाणे सवलत मिळावी.
- आर्थिक भुदंड रद्द करा : स्मार्ट कार्डसाठी आकारले जाणारे १९९ रुपयांचे शुल्क अन्यायकारक असून ते रद्द करावे.
- महिलांच्या सोयीसाठी ही जाचक अट त्वरित मागे घ्यावी, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.
- या पत्राची प्रत नागपूर विभाग नियंत्रकांनाही (ST महामंडळ) माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.




