- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : विदर्भात उद्योगांना लागणारे मनुष्यबळ तयार करण्याची आवश्यकता – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर समाचार : विदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन उद्योग येऊ घातले असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उद्योगांना लागणाऱ्या कौशल्य युक्त मनुष्यबळाची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलून दाखवली. याशिवाय विदर्भ क्षेत्राच्या एकंदर विकासासाठी आणि गरिबी निर्मूलनासाठी उद्योगधंद्यांच्या वाढीच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. विदर्भाच्या विशिष्ट जिल्ह्यांची बलस्थाने ओळखण्यावर त्यांनी भर दिला. जसे कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कॉटन बेस्ट इंडस्ट्री तयार करता येईल असं त्यांनी सुचवलं. याच प्रमाणे सर्व जिल्ह्यांची बलस्थाने ओळखली तर निर्यातआधारित उद्योग तयार होतील असे ते म्हणाले. गडचिरोलीच्या सर्वोत्तम दर्जाच्या आयरन ओरचा उल्लेख करत त्यांनी गडचिरोलीमध्ये जगाचे स्टील हब होण्याचे सामर्थ्य असल्याचा उल्लेख केला. याशिवाय त्यांनी असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तर्फे राज्य सरकारला पर्यटन विषयक शिफारसांचे औद्योगिक धोरणात यशस्वी समावेशन झाल्याबद्दल कौतुक केले.

पहिल्याच दिवशी 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या  

पहिल्याच दिवशी चार महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यातला पहिला करार सुपरस्मेलटर्स लिमिटेड यांचा असून ते पोलाद उद्योगात दहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. याचा लाभ गडचिरोलीसह, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना देखील होईल.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आगामी दहा वर्षात 15000 कोटींची गुंतवणूक करणार असून नागपूर मध्ये ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक आणि ट्रॅक्टर यासाठी इंटिग्रेटेड हब तयार करणार आहे. याचा विस्तार नाशिक आणि संभाजीनगर येथे देखील होणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकेल. याशिवाय एन-मोटिव इंडिया आणि जीआयबीसी आणि एआयडी दरम्यान करार करण्यात आले.

सत्यनारायण नुवाल यांचा सत्कार 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पद्मश्री सत्यनारायण नुवाल आणि त्यांच्या पत्नी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एआयडीचे सचिव डॉ विजय शर्मा यांनी लिहलेले मानपत्र त्यांनि वाचून दाखवले.

गुंतवणूकदारांचा सत्कार

यावेळी विदर्भात गुंतवणूक करणाऱ्या लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बालसुब्रमण्यम प्रभाकरन, अदानी समूहाचे (एअरपोर्ट्स) संचालक श्री. जित अदानी, तसेच महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक श्री. राजेश जेजुरीकर, पर्नोड रिकार्ड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री. जीन टोबूल, सुपरस्मेलटर्स लिमिटेडचे सीताराम अग्रवाल आणि गोयल गंगा समूहाचे अतुल गोयल यांचा सत्कार करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

अॅडव्हांटेज विदर्भ 2026 – खासदार औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशीष जयस्वाल, शिक्षण राज्यमंत्री. पंकज भोयर, माजी खासदार अजय संचेती, राज्य सरकारचे उद्योग सचिव डॉक्टर पी अनबल्गन, मुख्यमंत्र्यांचे मुख्य वित्तीय सल्लागार कौस्तुभ धवसे, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे सीईओ राजेश जेजुरीकर, अदानी ग्रुपचे (एअरपोर्ट्स) संचालक जीत अदानी, लॉईड्स मेटल अँड एनर्जी चे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरण, सोलर समूहाचे अध्यक्ष पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय एडवांटेज विदर्भ असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या चमु पैकी एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे, सचिव विजयकुमार शर्मा, यांच्याशिवाय सदस्य संजय गुप्ता, गिरधारी मंत्री, अशोक गोयल, प्रसन्न देशपांडे, निर्भय संचेती, प्रसन्न मोहिले, विनोद तांबी, निखिल गडकरी, राजेश रोकडे, रवी बोरटकर, प्रशांत उगेमुगे, महेश साधवानी, आलोक खंडेलवाल, अजय कपूर, महेंद्र क्षीरसागर, राजेश बागडी यांची उपस्थिती होती. याशिवाय आमदार परिणय फुके आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू मनाली क्षीरसागर देखील प्रामुख्याने उपस्थित होते.