- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपुर समाचार : गडचिरोलीला देशाचे ग्रीन स्टील हब बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अॅडव्हांटेज विदर्भ 2026 – खासदार औद्योगिक महोत्सव’चे भव्य उद्घाटन, पहिल्याच दिवशी 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

नागपूर समाचार : विदर्भातील नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याची ओळख ग्रीन स्टील हब ऑफ इंडिया अशी तयार करणार असून, गडचिरोलीमध्ये स्टील विषयक इकोसिस्टीम तयार करून चीनपेक्षा कमी दराचे स्टील संपूर्ण जगाला उपलब्ध करून देऊ असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर, अंबाझरी–अमरावती मार्ग, नागपूर येथे आयोजित असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंटच्‍यावतीने आयोजित एडवांटेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ते उपस्थित लोकांना संबोधित करत होते.

राज्यात वेगवेगळे मॅग्‍नेट (हब) तयार करून त्या शेजारचे जिल्हे विकसित करण्याचा उद्देश आहे, असे सांगत नागपूरमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने केलेल्या इंटिग्रेटेड ऑटोमोबाईल फॅसिलिटीबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. ही सुविधा 2028 मध्ये काम सुरू करण्याची शक्यता असून पंधरा हजार कोटींची गुंतवणूक या माध्यमाने होणार आहे. याशिवाय सोलर मॉडयूल मध्ये देशातली सर्वात मोठी इकोसिस्टीम नागपुरात तयार होत असून एक लाख रोजगार निर्मिती या माध्यमाने होणार आहे. अमरावती इथल्या यशस्वी इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कच्या धरतीवर दुसरा पार्क पीएम मित्रा योजनेअंतर्गत तयार होणार असून अमरावती एअरपोर्ट नजीक एव्हिएशन स्कूल तयार होत आहे. यामुळे यवतमाळ, बुलढाणा, वाशीम आणि अकोला जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. भविष्यातील जीसीसी लाट लक्षात घेता औद्योगिक धोरण महत्त्वाचे असल्याचा ते म्हणाले. 

याशिवाय नळगंगा प्रकल्प, जल नियोजन, फूड प्रोसेसिंग, गॅस बेस्ड इंडस्ट्री या सर्वांवर देखील त्यांनी सविस्तर चर्चा केली.

राज्याचे उद्योग सचिव पी अन्बलगन यांनी राज्यात होऊ घातलेल्या तीन औद्योगिक क्लस्टर बद्दल माहिती देत 2047 पर्यंत विदर्भ मोठ्या प्रमाणात देशाच्या विकासात योगदान देईल असे सांगितले.

तत्पूर्वी असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी प्रास्ताविकातून मागील दोन खासदार औद्योगिक महोत्सव यांचा आढावा घेत यादरम्यान मिळवलेल्या उपलब्धि उपस्थित सर्वांना सांगितल्या. एआयडीच्या माध्यमातून जीसीसी आणि बांबू विषयक प्रस्ताव मंजूर करून ते सरकारने औद्योगिक धोरणात सामील केले. याशिवाय शंभर एकर वर ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटीचे कार्य प्रगतीपथावर असून मनपा, एआयडी आणि टाटा स्ट्राइड हे देखील एकत्रितपणे विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय यंदा एडवांटेज विदर्भचे स्वरूप अधिक व्यापक असल्याचे सांगून 370 स्टॉल तीन दिवस बिजनेस आणि भव्य एक्सपो याशिवाय संध्याकाळच्या वेळी मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचा अंतर्भाव असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमात बोलताना अदानी समूहाचे संचालक जित अदानी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पातील दूरदृष्टीपूर्ण आणि सकारात्मक धोरणांमुळे भारत २०४७ पर्यंत सातत्याने आर्थिक प्रगती साधत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले. आभार प्रदर्शन कार्यकारी सदस्य निर्भय संचेती यांनी केले.