नांदेड समाचार : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ आज नांदेड येथे आयोजित ‘विजय संकल्प रॅली’मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित नांदेडवासियांशी संवाद साधला.
गोदावरीच्या कुशीत वसलेल्या आणि काळेश्वराचा आशीर्वाद लाभलेल्या नांदेडमध्ये आज जमलेला जनसागर पाहता 16 तारखेला नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर होईल याची ग्वाही मिळाली. भाजपाने नांदेडसाठी विकसित नांदेडचा संकल्पनामा तयार केला असून हा संकल्पनामा पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.
नांदेडमधील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर देण्याचा आमचा निर्धार आहे. यासाठी ‘अतिक्रमणधारक’ म्हणून हिणवले जाणाऱ्या गरिबांना मालकी हक्काचे पट्टे देऊन ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)’ अंतर्गत त्यांना पक्की घरे दिली जातील. त्यासोबतच इनाम जमिनी, देवस्थान जमिनी, मदत मास, खिदमत मास जमिनींवर वसलेल्या लोकांना त्यांच्या हक्काचे पीआर कार्ड आणि मालकी हक्काचा पट्टा देण्यात येईल. याव्यतिरिक्त, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, दर्जेदार रस्ते आणि नांदेड-जालना-परभणी मार्गासाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आला आहे.

नंदीग्राम मार्केटमधील पार्किंग सुविधा, सिडको भागात बगीचा व जलतरण तलाव, थीम पार्क, सौर ऊर्जा प्रकल्प, नाल्यांची कामे अशी अनेक विकासकामे हाती घेतली आहेत. गोदावरी नदीचे पर्यावरणीय संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र मिशन सुरू केले असून गोदावरी स्वच्छ व निर्मळ ठेवण्याचा आमचा संकल्प आहे. नांदेडमध्ये आधुनिक उपचार पद्धतींनी सज्ज असे कर्करोग रुग्णालय सुरू करण्यात येत आहे. नांदेड-लातूर आणि नांदेड-बिदर या दोन्ही रेल्वे लाईनला मान्यता देण्यात आली असून त्यासाठी राज्य सरकार देखील निधी देणार आहे.
आम्ही नांदेडला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडणार आहोत. मराठवाड्याचे प्रमुख शहर असलेले नांदेड महाराष्ट्रातील अग्रगण्य शहर बनू शकते. नांदेडला स्मार्ट आणि सेफ सिटी बनवण्यासाठी आम्हाला नांदेडकरांचे आशीर्वाद हवे आहेत. म्हणूनच नांदेडकरांना आवाहन आहे, 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या, पुढील 5 वर्ष नांदेडची जबाबदारी आम्ही घेऊ.
यावेळी मंत्री पंकजाताई मुंडे, खासदार अशोक चव्हाणजी, खासदार डॉ.अजित गोपछडे व इतर मान्यवर उपस्थित होते.




