- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपूर मनपा निवडणूक – राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आभाताई पांडे यांचा प्रभाग 21 मधून अर्ज

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा आभा पांडे यांनी प्रभाग क्रमांक 21 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

नामांकनाच्या वेळी आभा पांडे यांनी समर्थक आणि पक्ष कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली राजकीय ताकद दाखवून दिली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

23 डिसेंबरपासून नागपूर मनपा निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांत एकही अर्ज दाखल झाला नव्हता. मात्र, अंतिम तारीख जवळ येताच उमेदवारी अर्ज भरण्याचा वेग वाढू लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आभा पांडे यांनी शुक्रवारी आपला अर्ज दाखल केला.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या वतीने उमेदवारी दाखल करताना आभा पांडे यांनी नामांकनाआधी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. या रॅलीत मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना आभा पांडे म्हणाल्या की, त्या सातत्याने आपल्या प्रभागात काम करत आहेत. प्रशासक राज असतानाही त्यांनी परिसरासाठी निधी उपलब्ध करून घेतला आणि विविध विकासकामांना गती दिली असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी निवडणुकीत जनतेचा विश्वास कायम राहील, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.