नागपूर समाचार : गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था आणि एमएसएमई डीएफओ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘परसेप्शन एक्स्पो–2025’ चे उद्घाटन आज सिव्हिल लाइन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात संपन्न झाले. महिला उद्योजकांना प्रोत्साहन, बाजारपेठेची ओळख आणि विविध उद्योगांतील नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे.
उद्घाटन समारंभात एमएसएमई डीएफओचे संचालक श्री. व्ही. आर. शिरसाट तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक सौ. आस्था कार्लेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. कांचनताई गडकरी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

उद्घाटन प्रसंगी विविध महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या उत्पादनांचे स्टॉल्स पाहणीसाठी खुले करण्यात आले. फॅशन, फूड प्रोसेसिंग, हस्तकला, आरोग्य, स्टार्टअप्स, कौशल्य आधारित व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांचा समावेश असलेल्या या एक्स्पोला महिला उद्योजिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी महिला उद्योजकतेला अधिक चालना देण्यासाठी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले. एक्स्पो पुढील काही दिवसांसाठी सर्वांसाठी खुला राहणार आहे.




