रामटेक समाचार : बोरडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विविध समस्यांची झगडत आहे. शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने येथील विद्यार्थ्यांना विविध समस्येला सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने संबंधित शाळेला वाली कोण? हा मुख्य प्रश्न पालकांना पडला आहे. मनसर केंद्रातील सर्वात जास्त पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरडा येथे शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शालेय नुकसान होत आहे.
त्यामुळे ग्रामस्थ व उपसरपंचांनी प्रशासनाकडे २ अतिरिक्त शिक्षक देण्याची मागणी केली आहे. बोरडा शाळेत एकूण ८ वर्ग असून विद्यार्थ्यांची संख्या १७३ अशी आहे. येथे ८ शिक्षक कार्यरत होते. मात्र मे-जून महिन्याच्या कालावधीत त्यातील दोन शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे सध्या ६ शिक्षक कार्यरत आहे. शाळेत एकूण ८ वर्ग असून पटसंख्या ही जास्त असतांना ६ शिक्षक प्रत्येक वर्गांवर वेळ देऊ शकत नसल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होतं आहे.
याच गोष्टीची जाणीव घेत गावातील नागरिक व उपसरपंच पंकज चौधरी यांच्या नेतृत्वात शाळेला २ शिक्षक देण्याची मागणी गटविकास अधिकारी, पंचायत समिती रामटेक व गटशिक्षणाधिकारी रामटेक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी गावचे उपसरपंच पंकज चौधरी, प्रीतम वासनिक, अभिजित रामटेके, कुशाल राऊत, वैभव शेंडे,अजय लांजेवार उपस्थित होते.