संविधान चौकातून आंदोलकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नागपूर समाचार : जनतेचे हक्क हिरावले जाणार नाहीत, अन्याय सहन केला जाणार नाही या निर्धाराने बुधवारी नागपूरच्या संविधान चौकातून पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय मजदूर सेना आणि दलित मुक्ती सेनेच्या बॅनरखाली भव्य हल्लाबोल आंदोलन उभारण्यात आले. शासनाकडून वारंवार होत असलेल्या जनहिताच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा तीव्र निषेध करत या आंदोलनातून जनतेच्या मूलभूत मागण्या सरकारपुढे जोरकसपणे मांडण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष मा. कैलाश बांबोले यांनी केले तर विशेष उपस्थिती जिल्हाध्यक्ष मा. विजय पाटील यांची होती. आंदोलनाला लाँग मार्चचे प्रणेते व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) व राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. जयदीपभाई कवाडे यांचे थेट मार्गदर्शन लाभले.
संविधान चौकातून सुरू झालेला मोर्चा घोषणाबाजीच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये स्मार्ट मीटर जबरदस्ती लावणे थांबवणे, पटवर्धन मैदान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारकाचे काम सुरू करणे, दीक्षाभूमी परिसराचे सौंदर्यीकरण तातडीने पूर्ण करणे, नागपूर शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविणे, लष्करी बाग व लक्ष्मीनगर झोनमधील रहिवाशांना मालकी पट्टे देणे, इंदौरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वसतिगृह व वर्कशॉपची सुविधा निर्माण करणे, नागपूर मेट्रोमुळे निर्माण झालेल्या जीवघेण्या गुह्यांची दुरुस्ती करणे, मनपा व जिल्हा परिषदेतील शाळा बंद न करणे, महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा रद्द करणे, कोराडी प्रकल्पातील कंत्राटी कामगारांना कामावर घेणे, आरोग्य विभाग व मनपातील कंत्राटी कामगारांना स्थायी करणे, ठेकेदारी पद्धती रद्द करणे, नागपूर बससेवेतील चालकांवरील गुन्हे मागे घेणे, ताजबाग रहिवाशांना मालकी पट्टे देणे, उमरेड–कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पातील 99 प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरी देणे तसेच शासकीय दूध व्यवसाय विकास योजना येथील 17 स्थायी कामगारांचे थकीत वेतन व एरिअर्स तत्काळ देणे अशा मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनात नागपूर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र डोंगरे, विदर्भ प्रदेश संघटक अंकित धुपे, नागपूर जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष पलाश ठवरे, शहर महिला आघाडी अध्यक्षा प्रतिभा मानवटकर, शहर युवा आघाडी अध्यक्ष सोहेल खान, पूर्व विदर्भ सचिव डेनी सोमंकुवर, महिला आघाडी अध्यक्षा सूचिता कोटांगले, ग्रामीण महिला आघाडी अध्यक्ष सुनीता शेंडे, उत्तर नागपूर अध्यक्ष कुंदन उके, तसेच अजय चव्हाण, दिलीप पाटील, सोपान मानवटकर, शितल बोरकर, संजय खांडेकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी, महिला व युवक कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले. संविधान, लोकशाही व सामाजिक न्यायाचे रक्षण करण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी सदैव अग्रभागी राहील. जनतेच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे देण्यात आला.