विद्यापीठात महिला सुरक्षा आणि लैंगिक समानता विषयावर जनजागृती कार्यक्रम
नागपूर समाचार : सुदृढ समाज निर्मितीसाठी लैंगिक समानता आवश्यक असल्याचे प्रतिपादन नागपूर कौटुंबिक न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश मीराताई खड्डक्कार यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘सुरक्षा आणि सक्षमीकरण : महिला सुरक्षा आणि लैंगिक समानता’ या विषयावर अंबाझरी रोडवरील गुरुनानक भवन येथे मंगळवार, दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी जनजागृती कार्यक्रम पार पडला. विद्यापीठ कार्यस्थळी लैंगिक शोषण व लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण समिती, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून खड्डक्कार मार्गदर्शन करीत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर कौटुंबिक न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश मीराताई खड्डक्कार, अतिथी वक्ता म्हणून स्त्री रोगतज्ञ डॉ. नीता सप्रे, विशेष अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, सामाजिक कार्यकर्ता माधुरी साकुलकर, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. विजय खंडाळ, कार्यस्थळी लैंगिक शोषण व लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण समितीच्या अध्यक्षा डॉ. शालिनी लिहितकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. समाजामध्ये महिला सुरक्षित तसेच सक्षम असणे आवश्यक असल्याचे खड्डक्कार यांनी पुढे बोलताना सांगितले. भारतातील महिला जगातील महिलांच्या तुलनेत भाग्यवान आहेत. भारतात संविधान लागू झाले तेव्हाच महिलांना समानता मिळाली. जगातील इतर देशात मात्र मतदानाचा अर्थात समानतेचा अधिकार मिळविण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागला, असे खड्डक्कार म्हणाल्या. वास्तवात परिस्थिती तशीच असून महिलांना समाजामध्ये दुय्यम स्थान दिल्या जाते. समाजात समानता मानली जात नाही. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना काही गोष्टींचा सामना करावा लागतो. महिलेसाठी सर्वाधिक सुरक्षित घर मानले जाते, असे असताना देखील महिलांच्या सुरक्षेसाठी कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा करावा लागला आहे. समाजात महिलांवर अनेक अत्याचार होताना दिसत असून अनेक प्रकरणे समोर येत असल्याने फौजदारी कायद्यात अनेक सुधारण्या करण्यात आल्या.
त्याचप्रमाणे महिला घराबाहेर येत सक्षम सबल व्हावी सुरक्षित असावी म्हणून कायदा करावा लागला. सक्षमीकरण म्हणजे अर्थार्जन करणे नव्हे तर गुणांना वाव मिळून महिला व पुरुष समान मानणारे व्यक्तिमत्व घडावे, असे त्यांनी सांगितले. मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग अर्थार्जन करण्यास झाला. ज्ञानाचा उपयोग समाजसेवा, देशसेवा करण्यासाठी आवश्यक आहे. संविधानाने अधिकार दिला. कायदे झाले नोकरीच्या ठिकाणी अधिकार मिळाले. एक पंख जर कमजोर असेल तर त्याला बळकट करण्यासाठी तजवीज करावी लागते महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी संधी देणे आवश्यक आहे. कर्तव्याच्या ठिकाणी कार्य करीत असताना येणाऱ्या अडचणी राजस्थान येथील एका प्रकरणाची माहिती देत असताना १९९२ मध्ये अस्तित्वात आलेल्या कायद्याची माहिती त्यांनी यावेळी त्यांच्या भाषणातून दिली. कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनी लैंगिक समानता निर्माण करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचे आवाहन खड्डक्कार यांनी यावेळी केले.
आचरणातून येणार समानता : कुलगुरू
स्वतःपासून बदल करीत महिला व पुरुष असा भेद न करता कौशल्य कोणतेही कार्य मानून करणे आवश्यक आहे. आपल्या आचरणातूनच लैंगिक समानता निर्माण होईल, असे प्रतिपादन माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी केले. संपूर्ण जगात महिलांची लोकसंख्या अर्धी असताना घर, कार्यालयात सुरक्षित नसल्याने महिला सुरक्षा व सक्षमीकरणासाठी विविध कायद्यांची निर्मिती करण्यात आली. पुढचे भविष्य चांगले ठेवायचे असेल तर महिला सुरक्षित असणे गरजेचे आहे. महिलांना शारीरिक, भावनिक, मानसिक, आर्थिक, राजकीय असे सर्वांगीण सुरक्षा असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. असमानतेचा भेद गर्भातूनच सुरू होत असल्याने प्रत्येक व्यक्तीने लैंगिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टीने विचार करण्याची गरज कुलगुरूंनी व्यक्त केली.
सर्वांच्या प्रगतीला संधी देणारा समाज घडावा : साकुलकर
सर्वांच्या प्रगतीला संधी देणारा समाज घडावा, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता माधुरी साकुलकर यांनी केले. महिला सुरक्षा हा चिंतेचा विषय असून लैंगिक समानता आल्यास अशा प्रकारचे जागृती करणारे कार्यक्रम घेण्याची वेळ येणार नाही. लिंगभेद हा सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या घडविला जातो. समाज संस्कृती आणि पालन यातून लैंगिक असमानता निर्माण पुण्यात सुरुवात होते. मात्र, परिस्थिती बदलते आहे. या दृष्टीने आणखी तपासून पाहण्याची गरज आहे. जगाच्या तुलनेत यात आपण खूप मागे असून समानता आणण्याकरिता १५० वर्ष यायला लागेल असे साकुलकर म्हणाल्या. नैसर्गिक सामाजिक लैंगिक समानता लिंगभेद आदी विषयावर त्यांनी विस्तृत माहिती दिली. पूर्वीच्या काळातील उदाहरणे देत महिला आणि पुरुष यांच्यातील नैसर्गिक फरक देखील त्यांनी समजावून सांगितला. या नैसर्गिक फरकाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती केल्यास लैंगिक समानता निर्माण करता येईल, असे देखील त्या म्हणाल्या.
महिलांचे आरोग्य व सुरक्षा हा सामाजिक प्रश्न : डॉ. नीता सप्रे
महिलांचे आरोग्य, सुरक्षा व लिंगभेद समानता हा सामाजिक प्रश्न असल्याचे प्रतिपादन नामवंत स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनिता सप्रे यांनी केले. पीपीटी च्या माध्यमातून डॉक्टर सप्रे यांनी महिला सुरक्षा त्यांचे आरोग्य आणि लैंगिक समानता याविषयी विस्तृत माहिती दिली. स्त्रीरोग तज्ञ म्हणून महिलांच्या सर्व समस्या जवळून बघितल्या असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांचे आरोग्य, शारीरिक संबंध, गर्भधारणा, मुलांचे जन्म कौटुंबिक हिंसा, मानसिक आरोग्य याबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यापीठाच्या कार्यस्थळी लैंगिक शोषण व लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण समितीच्या अध्यक्षा डॉ. शालिनी लिहितकर यांनी कार्यक्रमाबाबत विस्तृत माहिती दिली. कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षा बाबत जागृती व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण शैक्षणिक परिसर लिंगभेद विरहित व्हावा यासाठी समिती सतत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षात प्रथमच जेंडर ऑडिट करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रीती उमरेडकर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी मानले. यानंतर मयुरी पुरणकर यांनी महिलांचा बुद्ध्यांक महिला सुरक्षा व महिला सक्षमीकरणाबाबत विशेष व्याख्यान दिले.