नागपुर समाचार : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले आहे की, भारतीय राज्यघटनेनुसार समाजाला नाही तर जातीला आरक्षण दिले जाते.
त्यामुळे ‘मराठा समाजा’ला आरक्षण देणे शक्य नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी विदर्भातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने हे प्रमाणपत्र घेतले, मात्र इतर भागातील मराठा समाजाने ते घेतले नाही. त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणे शक्य नाही, असे तायवाडे यांनी म्हटले आहे.
विदर्भातील ‘मराठा कुणबी’ आणि डॉ. पंजाबराव देशमुखांची दूरदृष्टी
डॉ. पंजाबराव देशमुख, ज्यांना महाराष्ट्रातील कृषी आणि शिक्षण क्रांतीचे जनक मानले जाते, त्यांनी ६० च्या दशकात मराठा शेतकरी हे मराठा नसून ‘मराठा-कुणबी’ आहेत, अशी मांडणी केली आणिती घटनात्मक दृष्ट्या मंजूर झाली. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे विदर्भातील अनेक मराठा समाजाच्या लोकांनी कुणबी असल्याची प्रमाणपत्रे मिळवली. याचा फायदा त्यांना १९९० साली मंडल आयोगाच्या शिफारशींनंतर झाला, जेव्हा ओबीसी प्रवर्गात १९% आरक्षण जाहीर झाले.
विदर्भातील ‘मराठा-कुणबी’ समाजाला आजही या आरक्षणाचा फायदा मिळत आहे, असे तायवाडे यांनी सांगितले.
सरकारची भूमिका आणि ओबीसी महासंघाचे मत
दरम्यान, सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरांगे पाटील यांचे आंदोलन हे राजकीय आरक्षणासाठी असल्याचे म्हटले आहे. यावर नागपूर भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण देण्याची भूमिका मांडली आहे. ओबीसी महासंघ त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करत असल्याचे बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले.




