- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : ‘महाज्योती’च्या ज्ञानप्रकाशातून बहुजनांच्या प्रगतीची वाटचाल – मिलिंद नारिंगे

नागपुर समाचार : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांनी घडवून आणलेली सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांती आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच माझ्यासाठी खरी प्रेरणा आहे. ‘महाज्योती’च्या योजनांना अधिक गती देत, पारदर्शकता व प्रगतीशील दृष्टिकोन स्वीकारून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सेवांचा लाभ पोहोचवणे हे ‘महाज्योती’चे प्रमुख ध्येय आहे, असे प्रतिपादन नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केले.

महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूरच्या (महाज्योती) व्यवस्थापकीय संचालकपदी सोमवारी मा. मिलिंद नारिंगे यांनी औपचारिकरीत्या पदभार स्वीकारला. यापूर्वी या पदाची जबाबदारी प्र. व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे यांनी यशस्वीरित्या सांभाळली होती. प्रशासकीय क्षेत्रातील दीर्घ अनुभव आणि नेतृत्वगुणांमुळे मा. नारिंगे यांचे योगदान उल्लेखनीय राहिले असून विविध शासकीय पदांवर त्यांनी जबाबदाऱ्या नेटकेपणाने पार पाडल्या आहेत.

संस्थेच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या स्वागत समारंभात मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. प्रशांत वावगे यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त संचालकांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे, प्रकल्प व्यवस्थापक विकास गडपायले, प्रकल्प अधिकारी धम्मा गजभिये, शुभम वैलथरे यांच्यासह संस्थेतील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सर्वांनी संस्थेच्या उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मा. नारिंगे यांनी पुढे सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी नेहमीच ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे तसेच सामाजिक आणि आर्थिक स्तरावर सक्षम करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्नशील राहून अनेक ठोस पावले उचलली आहेत. याच उद्देशाने त्यांनी महाज्योती संस्थेद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांना नवे बळ आणि दिशा मिळाले आहे.

‘महाज्योती’च्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा अशा अनेक योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. ‘महाज्योती’ ही संस्था केवळ योजना राबविण्यात मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेमार्फत होत असलेल्या या उपक्रमांना आणखी गती देण्यासाठी आणि कार्याला नवे आयाम मिळवून देण्यासाठी शासनाकडून मला जबाबदारी देण्यात आल्याचेही व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे म्हणाले.

पुढे बोलतांना मा. नारिंगे म्हणाले की, ‘महाज्योती’ ही संस्था इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था आहे. शासनाचा भाग असूनही तिचे कार्य केवळ शासकीय मर्यादांत अडकलेले नाही. आज ‘महाज्योती’ इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) विद्यार्थ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरली आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी साधारण 55 टक्के लोकसंख्या या तीन प्रवर्गांत मोडते. यावरून संस्थेच्या कार्याचा व्याप आणि राज्याच्या विकासातील योगदान स्पष्ट होते. या यशस्वी वाटचालीमागे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री व ‘महाज्योती’चे अध्यक्ष मा. श्री. अतुल सावे साहेब यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आहे, याचा मी मनःपूर्वक उल्लेख करतो. ते पुढे म्हणाले, ‘महाज्योती’च्या सर्व योजनांना गतिमान करणे, नव्या उपक्रमांची अंमलबजावणी करणे, संशोधन, प्रशिक्षण व प्रबोधनावर विशेष भर देणे आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पारदर्शकता टिकवून ठेवणे ही माझ्या कार्याची दिशा असेल. विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि सर्व हितचिंतकांनी साथ दिल्यास ‘महाज्योती’च्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक उत्थान, जनजागृती व क्षमता विकास साध्य करता येईल.

या समारंभात विद्यार्थ्यांनी व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांतून संस्थेच्या सामाजिक भक्कमपणावर, योग्य मार्गदर्शनावर व उपक्रमांच्या उपयुक्ततेवर मा. मिलिंद नारिंगे यांनी प्रकाश टाकला. ‘महाज्योती’ ही बहुजन विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व प्रगतीचा दीपस्तंभ ठरत राज्याच्या सामाजिक-शैक्षणिक उन्नतीसाठी नवी दिशा घडवेल, अशी भावनाही मा. मिलिंद नारिंगे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *