राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेचा नागपुरात आरंभ
आदिवासी महिलांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – डॉ.अशोक उईके
नागपूर समाचार : आत्मनिर्भर भारत’ म्हणजे समाजातील सर्वच घटकांचे सबलीकरण असून प्रबोधन व प्रशिक्षणातून आदिवासी महिलांच्या सर्वांगीण प्रगतीचे मार्ग दडले आहेत. महिलांनी आपल्या पूर्वजात कलेच्या जोपासनेसह नवीन ज्ञानाच्या उपासनेला प्राधान्य देऊन ज्ञानाचे रूपांतर कौशल्यात केले पाहिजे. कौशल्याचे रूपांतर संपत्तीत केल्यास आदिवासी महिला सशक्त व सबल होतील, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण मेळाव्यात प्रमुख उपस्थित म्हणून श्री. गडकरी बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, खासदार फग्गनसिंह कुलस्ते, श्यामकुमार बर्वे यांची मेळाव्यास प्रमुख उपस्थिती होती. आमदार कृपाल तुमाने, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त श्रीमती लीना बनसोड, अपर आयुक्त श्रीमती आयुषी सिंह, माजी महापौर माया इवनाते, गोंड राजे वीरेंद्र शहा, मानकर ट्रस्टचे अध्यक्ष श्री शिरोळकर आदी यावेळी उपस्थित होते.
विविध योजनांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारद्वारे आदिवासी महिलांना उद्योगात संधी उपलब्ध करून दिली जात असून त्यांनी सर्व क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, असे सांगून श्री.गडकरी यांनी उपस्थित महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. राज्यातील आदिवासी भागातील महिला व युवकांना ई- रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण आदिवासी विकास विभागाने दिल्यास त्यांना रोजगार मिळणे शक्य आहे. राणी दुर्गावती यांचा आदर्श आदिवासी महिलांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहनही श्री गडकरी यांनी यावेळी केले.
आदिवासी महिलांच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध
मंत्री डॉ. उईके म्हणाले, आदिवासी समाजाच्या महिलांमधील अंगभूत कौशल्य व कला गुणांना चालना दिल्यास आदिवासी समाज विकासाच्या अग्रस्थानी येऊ शकतो. त्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. आदिवासी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून कुटुंबाचे जीवनमान उंचावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आदिवासी महिलांनी रोजगार निर्मितीतही आपला ठसा उमटावा यासाठी प्रामुख्याने राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना तयार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी महिलांच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारचे पूर्ण पाठबळ असून या समाजातील प्रत्येक घटकासाठी उन्नतीच्या योजना राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण व महिलांसाठी वैयक्तिक तसेच सामूहिक लाभाच्या योजनांमधून त्यांच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या करून दिल्या जात आहे. त्यांच्यातील सर्व उपजातींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर नियोजन करण्यात येत असल्याचे डॉ. उईके यांनी सांगितले.
आपले संस्कार व संस्कृती प्राणपणाने जपणारी अशी आदिवासी समाजाची ओळख असून त्यांची जल, जमीन व जंगलाबद्दलची भावना आपण जाणतो असे सांगून डॉ. उईके यांनी महिलांमधील कला व सुप्त गुणांना वाव देण्याबाबत व त्यांच्या हस्तकला निर्मित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक विचार करण्यात येत असल्याची माहिती दिली.
चित्रकला, कपड्यांवरील पेन्टिंग, भांडीकाम, आभूषणांची निर्मिती यात आदिवासी महिला अग्रेसर आहेत. कलेचा हा वारसा वृद्धिंगत होत राहावा, काळाच्या ओघात ही कला लुप्त होता कामा नये यासाठी आदिवासी महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आदिवासी महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर
देशाचा विकास सामाजिक एकतेवर अवलंबून असतो. समाजातील सर्व घटकांना सामावून घेणाऱ्या योजना केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत असल्याचे श्री दुर्गादास उईके यांनी सांगितले. राणी दुर्गावती यांनी त्या काळात योद्धा महिलांची सेना निर्माण केली होती. महिला सबल असल्याचा हा मोठा पुरावा असल्याचे सांगून श्री उईके यांनी या महिला सर्व क्षेत्र पादाक्रांत करू शकतात असा विश्वास व्यक्त केला. धरतीआबा ग्राम उत्कर्ष योजना, कर्मयोगी योजना आदी योजनांच्या माध्यमातून आदिवासी महिलांच्या सक्षमतेला अधिक बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये ॲनिमिया, सिकलसेल व कुपोषणाची समस्या आढळत असून त्यावर करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा लाभ या महिलांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र शासनातर्फे स्वयंसहायता समूह गटाच्या माध्यमातून निर्माण कृषी व वन उत्पादनाला बाजारपेठ व मालाला योग्य भाव मिळवून देण्यात येत असून त्यामुळे या महिलांच्या आर्थिक सक्षमतेचे चित्र निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
पायाभूत सुविधांची निर्मिती करून भौतिक जीवनात बदल झाला असला तरीही विविध योजनांच्या माध्यमातून आदिवासी महिलांचे जीवनमान उंचावण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे श्री जयस्वाल यांनी सांगितले. सामूहिक विकास व वनक्षेत्रातील आदिवासींच्या विकासाचे उद्दिष्ट राज्य शासन पूर्ण करत आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी खर्च करण्यात येत असून वन कायद्याअंतर्गत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
खासदार फग्गनसिंह कुलस्ते व श्यामकुमार बर्वे यांनी आपल्या मनोगतात मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला तसेच विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या आदिवासी महिलांना साहित्याचे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिराचे आयोजनही येथे करण्यात आले होते. आदिवासी महिलांनी लावलेल्या विविध उत्पादनांच्या स्टॉल्सला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती लीला बनसोड यांनी केले. आदिवासी महिला मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होत्या.