- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपुर समाचार : जिल्हा वार्षिक योजनेतून साकारल्या जाणाऱ्या विविध विकासकामांची कल्पना स्थानिक लोकप्रतिनिधींना द्यावी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हा नियोजन सभागृह येथे आढावा बैठक संपन्न 

नागपूर समाचार : जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत विविध विभागांना उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून विविध योजना साकारल्या जातात. यातून नाविन्यपूर्ण योजना आकारास येतात. या कामांमधून विविध ठिकाणी असलेल्या इतर व्यावसायिक आस्थापनातून अप्रत्यक्षपणे स्वयंरोजगाची निर्मिती होत राहते. जिल्हा वार्षिक योजनेतील कामे निश्चित करताना यापुढे ज्या भागात ही कामे प्रस्तावित केली आहेत त्या भागातील लोकप्रतिनिधींना विभाग प्रमुखांनी कल्पना देऊन कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत यापूर्वी ज्या विभागांकडे निधी वर्ग करण्यात आलेला आहे त्यांनी कोणत्याही स्थितीत येत्या 15 ऑगस्ट पर्यंत त्या-त्या योजनांसाठी शासन निर्णयानुसार निधी खर्ची घालण्याबाबत योग्य ती खबरदारी व पूर्तता करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. लोकाभिमुख प्रशासनासह सर्व सामान्य जनतेला शासकीय योजनांचा सुलभ लाभ पोहोचावा यासाठी आपण कटीबद्धता स्विकारली आहे. सर्वांसाठी घरे ही महत्वाकांक्षी योजना असून जिल्हा प्रशासन, मनपा, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा परिषद यांनी परस्पर समन्वय ठेवून पट्टे वाटप मोहीमेला अधिक गती देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या काही दिवसात विविध सण व उत्सवासह सर्वांच्या भक्तीचा गणेशोत्सव सुरु होत आहे. विविध मंडळांना त्यांना आवश्यक त्या परवानग्या, सुरक्षितता मिळावी, गणपतीचे विसर्जन श्रद्धापूर्वक करता यावे यासाठी कुत्रिम तलावाची निर्मिती ही कामे मनपाने युद्धपातळीवर केली पाहिजे. मनपाच्या प्रत्येक झोननिहाय एकखिडकी योजना यासाठी सुरु करण्यास त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधीक्षक, एनएमआरडीए, पोलीस आयुक्त यांनी एकत्रित येऊन या गणेशोत्सवात अधिक सूत्रबद्ध होऊन नियोजन करावी, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *